वसई: पर्यावरण (संरक्षण) अधिनियमातर्गत मिरा भाईंदर, वसई विरार आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दाखल गुन्ह्यांची निष्पक्ष तपासणी आणि पर्यावरणीय गुन्ह्यांतील अनियमिततेची चौकशी, या प्रमुख मागण्यांसाठी मिरा-भाईंदर शहरातील पर्यावरणप्रेमींनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयाबाहेर शांततापूर्ण निदर्शने केली. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले
या वेळी आंदोलनकर्त्यांनी “निष्पक्ष तपास करा, पर्यावरणाला न्याय द्या”, “पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास पारदर्शक करा”, “कांदळवन वाचवा”, “नो मँग्रोव्ह्स , नो फ्युचर” अशा संदेशांचे फलक हातात घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनात, सन २००५ ते २०२५ या कालावधीत मिरा भाईंदर, वसई विरार आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गत नोंद झालेल्या २०० हून अधिक पर्यावरणीय गुन्ह्यांचा विशेष तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आवश्यक पर्यावरणीय परवानग्या न घेता कामांना प्रशासकीय मान्यता देणाऱ्या संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांची भूमिका तपासून, दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी व तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करून आवश्यक असल्यास पुनर्तपास करण्याचीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच पर्यावरणीय गुन्ह्यांचा संथ गतीने होणारा तपास व दोषींवर ठोस कारवाईचा अभाव यामुळे शहरातील निसर्गद्रोही, पर्यावरण नष्ट करणारे आणि कथित पर्यावरण भूमाफिया मोकाटपणे कार्यरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. अशा व्यक्तींवर वेळेत व प्रभावी कारवाई न झाल्यास शहरातील कांदळवने, जलस्रोत, जैवविविधता आणि नैसर्गिक संपत्तीचे अपरिमित नुकसान होत राहील, अशी भीतीही पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली.
