वसई:- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलाजवळच्या भागात प्राधिकरणाने काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र त्या कामात कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीला त्रस्त झाल्याने स्थानिक भूमिपुत्र आक्रमक होत काम बंद पाडले.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. हा महामार्ग मुंबई, ठाणे, वसई विरार, मिरा भाईंदर, पालघर, गुजरात यासह इतर भागांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचणे, खड्डे पडणे, वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत आहेत.
तर दुसरीकडे मुंबई-अहमदाबाद महामार्ग, वर्सोवा पूल आणि फाऊंटन-घोडबंदर रस्ता या ठिकाणी सातत्याने सुरू असणाऱ्या दुरुस्तीच्या कामांमुळे वाहनांचे अपघात, वाहने रस्त्यात बंद पडणे, अवजड वाहनांची वाहतूक यामुळे अनेकदा नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.महिनाभरापासून महामार्ग प्राधिकरणाने वर्सोवा पुलाजवळच्या भागात रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे.
मात्र, काम सुरू करताना त्याचे नियोजन योग्यरित्या करण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कामाचे नियोजन नसल्याने ठाणे व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी होऊ लागली आहे. कधी कधी वाहनांच्या रांगा लांबच लांब जात असून याचा मोठा फटका प्रवाशांना बसू लागला आहे. महिनाभरापासून काम सुरू असून ते अंत्यंत संथ गतीने सुरू आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी थेट महामार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला. यावेळी काम करीत असताना प्रवाशांच्या सोयीसुविधेची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी केला आहे. काम सुरू आहे तेवढ्या भागातच आधी बॅरिगेट लावणे गरजेचे असताना त्या आधीच संपूर्ण रस्ताचा भाग बंद केला जात आहेत. त्यामुळे वाहनांना ये-जा करण्यास अडचणी येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना कोंडीचा फटका बसण्याची शक्यता
मालजीपाडा, ससूनवघर, ससूपाडा यासह या गावपाड्यात ही दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत. त्यांना नायगाव वसईसारख्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यास जावे लागते. मात्र, महामार्गावरील कोंडी या विद्यार्थ्यांसाठी मोठा अडसर ठरू शकते, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात
