वसई: नवऱ्याने दक्षिण आफ्रिकेत कोंडून ठेवलेल्या एका विवाहित तरुणीची पोलिसांनी सुखरूप सुटका करून भारतात आणले आहे. मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा कक्षाने अवघ्या ४८ तासांत सूत्रे हलवून तिची सुटका केली आहे. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.
पीडित महिला २५ वर्षांची असून ती भाईंदर येथे राहाते. दीड वर्षांपूर्वी तिचे गुजरातमधील एका तरुणाशी लग्न झाले होते. तिचा पती दक्षिण आफ्रिकेत नोकरी करत होता. ती गुजरात येथे आपल्या सासरी राहात होती. दीड महिन्यांपूर्वी तिचा पती तिला दक्षिण आफ्रिकेत घेऊन गेला. मात्र तिथे जाताच त्याने तिच्यावर सर्व प्रकारची बंधने लादली आणि तिला कोंडून ठेवले. तिने कुणाशी संपर्क करू नये यासाठी तिच्याकडील मोबाइल काढून घेतला. एका खोलीत तिला कोंडून तिचा पती तिला दररोज मारहाण करत होता. परदेशी गेलेल्या मुलीची काहीच ख्यालीखुशाली नसल्याने तिचे आई-वडील चिंतेत होते.

दररोज मारहण होत असलेली पीडित महिला सुटकेसाठी प्रयत्न करत होती. दरम्यान, तिचा पती नसताना तिने घरकाम करणाऱ्या महिलेचा मोबाइल घेतला आणि अवघ्या १ मिनिटांचा व्हिडीओ कॉल करून आपल्या आईला हा प्रकार कळवला.सोमवार ६ जून रोजी तिच्या आईने पोलीस आयुक्तालयातील भरोसा कक्षाकडे धाव घेतली. भरोसा कक्षाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय दूतावासाला हा प्रकार कळवला. भारतीय दूतावासाने सूत्र हालवून दक्षिण आफ्रिकेच्या दूतावासाकडे मदत मागितली. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोबाइलच्या लोकेशनवरून पत्ता शोधून काढला आणि पीडित तरुणीची सुटका केली.

तिला शुक्रवारी भारतात आणून तिच्या आई- वडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. माहिती मिळताच ४८ तासात परदेशातून या महिलेची सुटका करून भारतात आणण्यात भरोसा कक्षाला यश आले आहे. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेची परदेशातून अशा प्रकारे सुटका करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

.म्हणून करायचा छळ
पीडित महिलेचा पती हा कर्मठ आणि जुनाट विचारांचा होता. पत्नीला परदेशात नेताच तिच्या कपडे घालण्यावर आक्षेप घेतला. तिला कुणाशीही बोलायला बंदी घातली. त्यानंतर त्याने तिला थेट एका खोलीत कोंडून ठेवले. तिच्या कुटुंबीयांना खोटी माहिती देऊन संपर्क तोडून टाकला. दररोज तिला अमानुष मारहाण करत होता. याप्रकरणी पीडित महिलेची फिर्याद घेऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी सांगितले.