village youth help police to prevent crime zws 70 | Loksatta

गुन्हेगारी रोखण्यासाठी गावातील तरुण पोलिसांच्या मदतीला ; मांडवी पोलिसांकडून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना 

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर या ग्रामसुरक्षा दलाची सुरवात करण्यात आली आहे.

village youth help police

वसई :  बेकायदा कृत्यांना आळा घालून गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच बंदोस्तासाठी मदत मिळावी यासाठी मांडवी पोलिसांनी आता ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आहे. याअंतर्गत गावातील १०० तरुणांना टिशर्ट, काठय़ा, शिटी आणि ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे. पोलिसांच्या कामात सक्रिय मदत करण्यासाठी राबविण्यात आलेला अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.

मागील वर्षी विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून मांडवी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. मांडवी पोलीस स्टेशन हद्दीत ३२ गावं असून अनेक लहान पाडे आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ किलोमीटरचा राष्ट्रीय आणि १२ किलोमीटर लांबीचा राज्य महामार्ग आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्वच ठिकाणी लक्ष ठेवून बंदोबस्त ठेवता येत नव्हता. त्यामुळे या परिसरात चालणारी बेकायदेशीर कृत्य, अनैतिक प्रकार यांना आळा घालण्यासाठी तसेच सण, निवडणुका आदींच्या वेळी बंदोबस्त ठेवण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाची संकल्पना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रपुल्ल वाघ यांनी मांडली होती. ग्रामस्थांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. गावातील तरुणांची पडताळणी करून १०० तरुण निवडण्यात आले आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर या ग्रामसुरक्षा दलाची सुरवात करण्यात आली आहे. त्यांना टी-शर्ट, लाठी, शिट्टी आणि ओळखपत्र देण्यात आले आहे. यामुळे गावातील चोरी, घरफोडी आदी गुन्हेगारीला आळा बसेल ग्रामस्थ भयमुक्त वातावरणात राहू शकतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी व्यक्त केला. विविध प्रकारच्या बंदोबस्तासाठी, मोहिमांसाठी देखील या ग्रामसुरक्षा बलाचा उपयोग होणार असल्याचे सांगितले. पोलीस आयुक्तालयातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.

ग्रामसुरक्षा दल ही अभिनव संकल्पना आहे. पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद घडून सामाजिक कार्यात नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा या उद्देशाने या ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. हे ग्रामसुरक्षा दल पोलिसांचे कान आणि डोळे म्हणून काम करेल आणि यामुळे परिसरातील कायदा सुव्यस्था चांगली राहून गुन्ह्यांना प्रतिबंध घालता येणार आहे. 

– सुहास बावचे, उपायुक्त, परिमंडळ ३

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 03:00 IST
Next Story
नालासोपारा येथे टॅंकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू