वसई: मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे रस्ते ही निसरडे झाले आहेत.पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात २२ वर्षाय तरुणाचा मृत्यू झाला. त्याने हेल्मेट घातले नव्हते. याप्रकऱणी विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल गरेल (२२) हा वसई पूर्वेच्या भाताणे गावात रहात होता. तो विरार येथे काम करत होता. सोमवारी संध्याकाळी कामावरून सुटल्यावर तो नेहमीप्राणे आपल्या दुचाकीवरून ( एमएच ४८ डीएफ ८६४१) घरी जाण्यासाठी निघाला होता. संध्याकाळी पावणे सातच्या विरार पूर्वेच्या उसगाव येथील स्टेल मॅक कंपनी समोरील रस्त्यावरून जात असताना पावसामुळे दुचाकी घसरली आणि विपुल खाली पडला. त्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी पारोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्याला तुंगारफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ९ च्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. विपुलने हेल्मेट घातले नव्हते. दुचाकीवरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, असे मांडवी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मांडवी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.