वसई: वसई विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास विरारच्या ९० फूट रस्त्यावर दुचाकी आणि रिक्षाची जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. यात दुचाकी चालक व रिक्षाचालक असे दोघेही जखमी झाले आहे.

विरार पूर्वेच्या भागात ९० फुटी रस्ता आहे. हाच रस्ता पूर्व व पश्चिम असा प्रवास करण्यासाठी सोयीचा असल्याने या रस्त्यावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळी अधिकच वाहनांची ये जा सुरू असते.

मंगळवारी सकाळी याच रस्त्यावरून जात असताना एक दुचाकीस्वार भरधाव वेगाने जात असताना समोरून जाणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात दुचाकी अक्षरशः रिक्षात घुसल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या दुर्घटनेत रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. मात्र, सकाळच्या वेळेत घडलेल्या या विचित्र अपघातामुळे ९० फूट रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.