भाईंदर :- मुंबईहून विरारकडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये चक्क श्वान प्रवास करत असल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचा व्हिडिओ एका प्रवाशाने समाजमाध्यमांवर शेअर केल्याने रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी दररोज प्रवास करतात. विशेषतः मुंबई ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून स्थानकांचे बांधकाम, पादचारी पूल, नव्या गाड्या तसेच एसी लोकल सेवेत वाढ केली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, एकीकडे प्रवासासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना, दुसरीकडे सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

अंधेरीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये एक श्वान संपूर्ण डब्यात फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर तो एका जागी झोपून गेला. ही संपूर्ण घटना एका प्रवाशाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. अनेक प्रवासी श्वानांना घाबरतात. अशा परिस्थितीत गाडीत श्वान आक्रमक झाला, तर प्रवाशांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे काही प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

तसेच, स्थानकांवर किंवा गाड्यांमध्ये श्वान मुक्तपणे वावरत असताना प्रशासन नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, स्थानकांवरील व गाड्यांमधील श्वानांना हटविण्याचे काम प्रशासनाकडून नियमितपणे केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, अशा प्रकारची घटना घडल्यास त्याची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रशासनाने दिली आहे.