वसई:- भाड्याने रिक्षा हवी असल्याचा बहाणा करुन रिक्षाचालकाला जंगलात नेऊन बेदम मारहाण करत रोख रकमेसह रिक्षा पळविल्याची धक्कादायक घटना घडली होती. विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या काही तासांतच शोध घेत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात चोरीला गेलेली ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रिक्षा चालकाला चार अनोळखी तरुणांनी ‘बरफपाडा ते विरार फाटा’ असे तातडीने जाण्याचे सांगून रिक्षा भाड्याने केली. रिक्षा कांदळपाडा (विरार पूर्व) परिसरात पोहोचली असता, आरोपींनी बाथरूमचा बहाणा करून रिक्षा थांबवण्यास सांगितली. रिक्षा थांबताच आरोपींनी चालकाची कॉलर पकडून त्याला जबरदस्तीने बाहेर खेचले आणि जवळच असलेल्या जंगलात नेले. तिथे त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण व शिवीगाळ करून त्याच्या खिशातील रोख रक्कम आणि ऑटोरिक्षा घेऊन पळून गेले.
याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३०९ (६), आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. तक्रारदाराने दिलेल्या आरोपींच्या वर्णनावरून आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी विरार पूर्वेच्या चंदनसार परिसरातून तीन आरोपींना अटक केली आहे.
अमन अरविंद ठाकुर (२५) प्रतिक मोहन सिंग(२०), मानव प्रदीप किणी(२२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून त्यांच्याकडून चोरीला गेलेली ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल.एम. तुरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेख गायकवाड प्रतापराव कदम, व पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, पोलीस हवालदार संदिप जाधव, अमोल चव्हाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, बालाजी शिंदे, पोलीस अंमलदार सोमानाथ कासार, उत्कर्ष सोनवणे आणि विलास राठोड यांच्या पथकाने केली आहे.
