वसई: वसई-विरार महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलाच्या उद्घाटनावरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि बहुजन विकास आघाडी (बविआ) यांच्यातील राजकीय संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. उद्घाटनापूर्वीच भाजपने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केल्याने शनिवारी परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बहुजन विकास आघाडी पाठोपाठ शनिवारी सकाळी विरार येथील बोळींज क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यानुसार पक्षाचे खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे-पंडित, विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते संकुलाबाहेर जमा झाले. उद्घाटनासाठी आलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावरच रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून थेट संकुलाच्या आवारात प्रवेश केला. आतील भागातही पोलिसांनी पुन्हा अडवल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पार्किंगच्या जागेतच ठिय्या आंदोलन सुरू केले.
गाड्यांच्या मुद्द्यावरून बविआला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
अजूनही क्रीडा संकुलाचे अधिकृत उद्घाटन झाले नसताना, बविआच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या गाड्या संकुलाच्या आवारात कशा उभ्या आहेत? असा सवाल उपस्थित करत भाजपने बविआला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “शासकीय किंवा पालिका मान्यता नसताना बविआच्या गाड्या आत असतील तर त्या त्वरित हटवण्यात याव्यात,” अशी आक्रमक मागणी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी केली. वाढता दबाव पाहून अखेर प्रशासनाला त्या गाड्या तिथून हटवाव्या लागल्या.
अपूर्ण क्रीडा संकुलाच्या श्रेयवादाची चढाओढ
क्रीडा संकुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही, बविआ पाठोपाठ आता भाजपनेही उद्घाटनाचा निर्णय घेतल्याने दोन्ही पक्षांत श्रेयवादाची जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे. सकाळी १० वाजता नियोजित असलेला भाजपचा हा कार्यक्रम पोलिसांचा विरोध आणि निर्माण झालेल्या गदारोळामुळे दुपारी दीड वाजेपर्यंत ताटकळला होता. या आंदोलनामुळे विरार बोळींज परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.
