वसई: विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरात एका निवासी इमारतीचा स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. येथील प्रथमेश नगरमधील ‘साई मल्हार’ इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅबचा मोठा भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत २७ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. सोसायटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच निष्पाप नागरिकाचा जीव धोक्यात आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती सुनील बागरी (वय २७) असे जखमी महिलेचे नाव आहे. रविवारी उशिरा रात्री ही दुर्घटना घडली. स्लॅब कोसळल्याचा प्रचंड आवाज झाल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबीय आणि स्थानिकांच्या मदतीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्योती यांना जवळच्या ‘साई समर्थ’ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

​स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत जर्जर आणि धोकादायक अवस्थेत होती. वसई-विरार महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी (प्रभाग समिती ‘सी’) यापूर्वीच इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करण्याबाबत रीतसर नोटीस बजावली होती. मात्र वेळीच या इमारतीची दुरुस्ती करण्यात न आल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात अधूनमधून इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या घटना समोर येत असल्याने जुन्या इमारती व धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.