वसई: मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत वसई-विरार क्षेत्रात होणाऱ्या विरार स्थानक परिसराचा सुनियोजित आणि आधुनिक विकास करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. या या परिसरासाठी पालिकेने एक विशेष ‘स्थानिक क्षेत्र विकास आराखडा’( लोकल एरिया प्लॅन) तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावित विकास आराखड्यावर नागरिकांकडून ३० दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या (बुलेट ट्रेन) राज्यातील चार स्थानकांपैकी एक असलेले विरार स्थानक नालासोपारा पूर्वेच्या वालईपाडा येथे तयार केले जाणार आहे. या स्थानक परिसराचा विकास करण्यासाठी ‘प्रोजेक्ट स्मार्ट’ हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने विशेष समिती स्थापन केली आहे. याची जबाबदारी महापालिकेवर ही सोपविण्यात आली आहे.
विरारमधील बुलेट ट्रेन स्थानकाच्या सभोवतालच्या ४६५ हेक्टर क्षेत्राचा विकास ‘जायका’च्या मार्गदर्शक तत्त्वांचा वापर करून जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह केला जाणार आहे. या विशेष विकास आराखड्यात प्रामुख्याने मौजे मोरे,तुळिंज, गोखिवरे, बिलालपाडा, धानिव आणि विरार अशा सहा गावातील भागांचा समावेश आहे.
या भागात जपानच्या धर्तीवर नागरी वसाहती, पर्यटन स्थळे विकसित केली जाणार आहे. तर नागरिकांच्या सोयीसाठी विविध अत्याधुनिक रुग्णालये, आरोग्य व्यवस्था यांसह विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
सुनियोजित विकासावर भर
या विकासयोजनेमुळे परिघातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, व्यावसायिक क्षेत्रे आणि रहिवासी भागांचा सुनियोजित विकास होईल. याशिवाय नागरिकांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. तसेच या भागात फोफावत असलेले अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण येणार आहे.
हरकती नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत
नागरिकांना या प्रस्तावित आराखड्याचा नकाशा प्रत्यक्ष पाहता यावा, यासाठी तो पालिकेच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विकास आराखड्याबाबत नागरिकांना काही आक्षेप, सूचना किंवा हरकती असल्यास त्या कारणांसह लेखी स्वरूपात सादर कराव्या लागणार आहेत. ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत ‘उपसंचालक, नगररचना विभाग, वसई-विरार शहर महापालिका’ यांच्याकडे जमा कराव्या लागतील. विहित मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यामार्फत सोमवारी यासंबंधीची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
