वसई: विरार पश्चिमेतील बस आगार परिसरात केली जाणारी अवैध पार्किंग आणि खाजगी वाहनांच्या दुहेरी रांगा यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. आगारालगतचा मुख्य वाहतुकीचा रस्ता अरुंद झाल्यामुळे पालिकेच्या तसेच एसटी महामंडळाच्या बसेसना ये-जा करताना अडथळा निर्माण होऊ लागला आहे.

विरार पश्चिमेला रेल्वे स्थानकालगत विरार बस आगार आहे. या बस आगारातून वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसेस तसेच एसटी महामंडळाच्या शहरांतर्गत प्रवाशांची ने-आण करणाऱ्या तसेच लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या सुटतात. याच बस आगाराच्या परिसराला लागून वसई विरार महापालिका, विरार रेल्वे स्थानक, विरार रेल्वे स्थानकाजवळ भरणारा बाजार आणि रिक्षा थांब्यांना जोडणारा मार्ग गेला आहे.

त्यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळ या रस्त्यावरून कामावर जाणारे नोकरदार, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांची मोठी वर्दळ असते.पण, या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागणाऱ्या खाजगी दुचाकींच्या रांगा, वेडीवाकडी पार्किंग यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे एखादी मोठी चारचाकी गाडी आणि बस समोरासमोर आल्यास किंवा लागोपाठ दोन बसेस अर्नाळा किंवा बोळींजच्या दिशेने निघाल्यास हा रस्ता पूर्णपणे जाम होतो.

त्यामुळे ही वाहने रस्ता पार करून जाईपर्यंत दुचाकी चालक आणि इतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीत ताटकळत राहावे लागते.दररोजच्या या वाहतूक कोंडीत स्थानक परिसरातील खाजगी बांधकाम प्रकल्प स्थळांवरून सामानाची आणि डेब्रिजची ने-आण करणाऱ्या अवजड वाहनांमुळे भर पडत आहे.

अनेकदा समान उतरवताना किंवा वाहन पार्क करताना लागणाऱ्या वेळामुळे बराचवेळ नागरिकांना तसेच बासचालकांना वाट पाहत उभे रहावे लागते. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करून या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी आता नागरिकांकडू केली जात आहे.

सम-विषम पार्किंगचं धोरण नावापुरतचं?

विरार बस आगारासारख्या वर्दळीच्या परिसरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून गेल्या वर्षी सम-विषम पार्किंगचे धोरण लागू करण्यात आले होते. पण, आगार परिसरातील कोंडीच्या रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या या पार्किंगच्या जागेवर गॅरेज चालकाने अतिक्रमण केल्यामुळे वाहन नेमके पार्क करावे कुठे? हा प्रश्न आता वाहनचालकांसमोर उभा राहिला आहे.