वसई: कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद होणारे प्रत्येक दृश्य केवळ निसर्गसौंदर्य नसते, तर कधीकधी ते एखाद्या गंभीर घटनेमागचे सत्यही समोर आणू शकते, याचा प्रत्यय विरारमध्ये आला आहे. विरार पूर्वेतील कोपर गावातील एका तरुणाला निसर्ग छायाचित्रणाचा छंद जोपासताना जंगलात एका तरुणाने गळफास घेतल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आणण्यात यश आले. दक्ष पाटील या तरुणाच्या दक्षतेमुळे मांडवी पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यास मोठी मदत झाली आहे.
मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेकडील कोपर गावात राहणाऱ्या दक्ष पाटील या युवकाला निसर्ग आणि वन्यजीव छायाचित्रणाची आवड आहे. रविवारी (७ जून) तो नेहमीप्रमाणे कोपर गावालगतच्या शेती आणि जंगल परिसरात मोबाईल कॅमेऱ्यातून निसर्गरम्य दृश्ये टिपत होता. परिसरातील विहंगम दृश्ये कॅमेऱ्यात कैद करत असताना, त्याने घेतलेल्या एका छायाचित्रात दूरवर काहीतरी संशयास्पद असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
दाट झाडी असल्यामुळे सुरुवातीला ती वस्तू नेमकी काय आहे, याचा अंदाज दक्षला आला नाही. त्यामुळे त्याने मोबाईल कॅमेऱ्याचा ‘झूम’ वापरून पुन्हा त्याच दिशेने एक छायाचित्र घेतले. हे छायाचित्र पाहताच त्याच्या अंगावर शहारे आले. दाट जंगलातील एका झाडाला एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याचे त्याला स्पष्टपणे दिसले. या अनपेक्षित आणि धक्कादायक दृश्यामुळे घाबरलेल्या दक्षने तातडीने गावाकडे धाव घेतली.
दक्षने गावात परतल्यावर घडलेला प्रकार आणि मोबाईलमधील छायाचित्रे गावातील प्रतिष्ठित नागरिकांना दाखवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावकऱ्यांनी तातडीने मांडवी पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने जंगलातील दुर्गम आणि दाट झाडी असलेल्या भागात धाव घेत घटनास्थळ गाठले.
मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात मृत व्यक्ती स्थानिक नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाची झडती घेतली असता, त्याच्या खिशात एक ओळखपत्र सापडले. त्या आधारे मृत व्यक्तीचे नाव लाल मोहन पारस चौव्हाण (३४) असून तो उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मांडवी पोलिसांनी तातडीने उत्तर प्रदेशातील त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना विरारमध्ये पाचारण केले. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
दक्षच्या जागरूकतेमुळे बेपत्ता तरुणाचे गूढ उलगडले
जंगलाचा हा भाग अत्यंत दुर्गम आणि मानवी वावर नसलेला असल्याने, दक्ष पाटीलने हे छायाचित्र काढले नसते, तर हा मृतदेह अनेक दिवस कुणाच्याही नजरेस पडला नसता आणि तो सडला असता, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. एका साध्या छायाचित्रामुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आणि एका बेपत्ता तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडलेले दक्षने दाखवलेल्या या जागरूकतेबद्दल आणि प्रसंगावधानाबद्दल पोलीस प्रशासनासह संपूर्ण परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
