वसई: वसई विरार शहरात वाढते प्रदूषण हा चर्चेचा मुद्दा बनलेला असताना विरारमधील एका भाग सध्या सिमेंटचा पाऊस पडत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच सततच्या सिमेंटच्या माऱ्यामुळे नागरिकांवर २४ तास दारं खिडक्या बंद ठेवावी लागत असल्याचे या व्हिडिओत सांगण्यात येत आहे.
सध्या वसई विरार शहरात घसरत चाललेली हवेची गुणवत्ता हा अतिशय चिंतेचा विषय बनला आहे. खासगी गृहप्रकल्प, तसेच महापालिकेचे विविध प्रकल्प, औद्योगिक वसाहती, कचऱ्याला लागणाऱ्या आगी यामुळे शहरातील वायूप्रदूषण वाढत आहे. पण, शहराच्या वेशीवर आणि काही ठिकाणी शहरात नागरी वस्त्यांना लागूनच असणारे आरएमसी प्लांट आता या वायुप्रदूषणात भर घालत आहेत.
नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार, विरार पश्चिमेला तिरुपती नगर आहे. या भागात युनिटेक नावाचे गृहसंकुल आहे. तर या संकुलाच्या अगदी समोरच सिमेंट निर्मिती करणारी एक कंपनी म्हणजे आरएमसी प्लांट आहे. महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करत हे प्लांट चालवले जात असल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे.
“तुम्ही अवकाळी पाऊस पाहिला असेल, बर्फवृष्टी पहिली असेल पण, विरारमध्ये चक्क सिमेंटवृष्टी होत आहे. रस्त्यावरची झाडं, रस्ते, लोकांची घरं सगळं या सिमेंटने माखलं आहे”, अशी टीका व्हिडिओ बनवणाऱ्या महिलेने केली आहे.
कंपनीच्या बाजूला उंच पत्रे नाहीत, तसेच हा प्लांट २४ तास सुरू असतो. त्यामुळे या प्लांटमधील सिमेंट वातावरणात आणि आसपासच्या परिसरात पसरू लागले आहे. दैनंदिन ये-जा करण्याचा रस्ता या सिमेंटने माखला आहे. तर तर प्लांटच्या अगदी समोरच असणाऱ्या रहिवासी गृहसंकुलात हे सिमेंट उडून जात असल्यामुळे रहिवाशांना दिवस-रात्र घराची दारं आणि खिडक्या बंद ठेवाव्या लागतात. तसेच यामुळे अनेकांना श्वसनाचे आजारही जडल्याचे महिलेने या व्हिडिओत सांगितले आहे.
आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी…
आरएमसी प्लांट चालकाच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण परिसरात सिमेंट पसरले आहे. यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण होऊन बसले आहे. तर या भागातील रहिवाशांच्या तब्येतीवरही विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. त्यामुळे एकतर आरएमसी प्लांट चालकाने शासनाने लागू केलेले नियम पाळावेत किंवा हा कारखाना विरळ लोकवस्तीच्या भागात स्थलांतरित करावा, अशी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
