​वसई:- विरार पूर्वेकडील चंदनसार परिसरात गुरूवारी पहाटे झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे एक महाकाय वडाचे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. या घटनेत झाडाच्या वजनामुळे परिसरातील विजेचे ३ ते ४ खांब आणि विद्युत तारा रस्त्यावर कोलमडून पडल्या आहेत. सुदैवाने पहाटेच्या वेळी ही घटना घडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला.

​ विरार परिसरात मुसळधार पावसासह वादळी वारा सुरू होता. या वादळाचा तडाखा बसल्याने चंदनसार येथील मुख्य रस्त्यावरील जुने आणि महाकाय वडाचे झाड मुळासकट उपटून रस्त्यावर कोसळले. झाड पडताना र विजेच्या तारांवर आणि खांबांवर आदळल्याने विजेचे ३-४ खांब अक्षरशः वाकले. रस्त्यावर झाडाचा मोठा पसारा आणि विजेच्या जिवंत तारांचे जाळे पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक दोन्ही बाजूंनी थांबवण्यात आली. यामुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती

​घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून आधी महावितरण कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून या भागातील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेल्या वडाच्या झाडाची छाटणी करून मुख्य रस्त्यावरील अडथळा दूर केला. या घडलेल्या घटनेमुळे परिसरातील शेकडो वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. कोलमडलेले विजेचे खांब बाजूला करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.