वसई: विरारमधील चंदनसार येथील बाजारात नाल्यातील पाण्याचा वापर भाज्या धुण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होताच नेटकऱ्यांकडून विविध नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

विरार पूर्वेला चंदनसार भाजी बाजार आहे. स्थानिक शेतकरी आणि भाजी विक्रेत्यांकडून या बाजारात फळे आणि भाज्यांची विक्री केली जाते. विरार पूर्व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी खरेदीसाठी येतात. मात्र, याच बाजारात नाल्यातील सांडपाण्याचा वापर करून धुतलेली भाजी विकली जात असल्याची चित्रफीत समोर आली आहे.

या चित्रफितीत एक महिला बाजाराच्या समोर असणाऱ्या नाल्यातील पाण्यात पालेभाज्या धुताना दिसत आहे. भरदिवसा बाजारात लोकांची वर्दळ असताना अगदी उघडपणे दूषित पाण्यात ही महिला भाजी धूत असल्याचे चित्रफितीमध्ये दिसून येत आहे. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यांवर प्रसारित होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हा प्रकार अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. अशा अस्वच्छ पाण्यात धुतलेल्या भाज्यांमुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच वसई विरार महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

यापूर्वीही एका फळ विक्रेत्याकडून गटारातील पाण्याचा वापर फळे धुण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे वारंवार अशा घटना समोर येत असल्यामुळे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.