वसई: विरार पूर्वेकडील एका रहिवासी इमारतीत बुधवारी रात्री आठच्या सुमारास एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. दुसऱ्या मजल्यावरील घराच्या ग्रीलमधून खेळता-खेळता अचानक खाली निसटलेला अवघ्या अडीच वर्षांचा चिमुकला पहिल्या मजल्यावरील पत्र्याच्या शेडवर पडल्याने सुदैवाने बचावला.
ग्रीलमधून थेट जमिनीवर कोसळण्याऐवजी शेडचा आधार मिळाल्यामुळे त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.मात्र घटनेनंतर चिमुकल्याच्या रडण्याचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील शेडवर बाळ अडकल्याचे पाहताच स्थानिकांनी क्षणाचाही विलंब न लावता शिडी व उपलब्ध साधनांच्या साह्याने त्याला सुरक्षितपणे खाली उतरवले.
स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे एका निष्पाप चिमुकल्याचा जीव वाचला आहे.चिमुकला सुखरूप असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या थरारक घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, लहान मुले असलेल्या पालकांनी आपल्या घरातील खिडक्या, बाल्कनी आणि ग्रीलच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
