वसई:- पश्चिम रेल्वेच्या विरार ते चर्चगेट लोकल प्रवासादरम्यान घडलेल्या एका संतापजनक घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकलमधून प्रवास करताना एक प्रवासी दरवाज्यात उभे राहून मद्यपान करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यावरून प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पश्चिम रेल्वेच्या लोकल मधून विरार ते चर्चगेट असा दररोज मोठ्या संख्येने प्रवासी करतात. लोकलमध्ये यापूर्वी मारामारी, धोकादायक स्टंटबाजी आणि गर्दीचे गैरफायदे उठवण्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. अशातच आता या मद्यपान करतानाचा प्रकार ही समोर आला आहे.
विरार स्थानकातील फलाट क्रमांक ३ वरून सकाळी ११.५० वाजता सोडण्यात आलेल्या चर्चगेट लोकलमध्ये एका बेजबाबदार प्रवाशाने चालत्या लोकलमध्ये काचेच्या बाटलीतून खुलेआम मद्यपान केले. एवढ्यावरच न थांबता, मद्यपान करून झाल्यानंतर या प्रवाशाने ती काचेची बाटली थेट रेल्वे रुळांच्या दिशेने बाहेर फेकून दिली. लोकल ट्रेन मधील एका जागरूक प्रवाशाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या व्हिडीओमुळे आता प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात असून रेल्वे सुरक्षा अन्य प्रवाशांच्या सुरक्षेबाबत ही प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा प्रकारे लोकल मध्ये मद्यपान करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांकडून केली जात आहे.
लोकलमध्ये मद्यपान करीत असलेला व्हिडीओ आमच्याकडे आला आहे. त्याचा पडताळणी करून पुढील तपास सुरू असल्याचे वसई रेल्वे पोलिसांनी सांगितले.
