वसई:- मोबाईलचा डिस्प्ले दुरुस्त करण्यासाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

विरार पूर्व येथील चंदनसार रोडवरील गडगापाडा, गोशाळेजवळ असलेल्या ‘आई जिवदानी दर्शन’ चाळीतील एका खोलीत हे कुटुंब राहते. रविवार, ३१ मे २०२६ रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास या १७ वर्षीय मुलीने तिच्या मोबाईलचा डिस्प्ले दुरुस्त करण्यासाठी आईकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिला होता.

​याच गोष्टीचा राग मनात धरून तिने राहत्या घरातील खोलीत छताच्या लोखंडी पाईपला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आईने दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल एम तुरे यांनी दिली आहे.

केवळ मोबाईल दुरुस्तीसारख्या किरकोळ कारणावरून एका १७ वर्षीय मुलीने आपले जीवन संपवणे, ही अत्यंत चिंताजनक आणि मन सुन्न करणारी घटना आहे.