वसई: ८ महिन्यांच्या चिमुकलीला ताब्यात घेण्यावरून झालेल्या कौटुंबिक वादातून सासर्‍याने दिलेल्या जोराच्या धक्क्यामुळे २८ वर्षीय सुनेचा फरशीवर कोसळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास विरार पश्चिमेच्या नारिंगी गावात घडली आहे. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात सासर्‍याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सासर्‍याला ताब्यात घेतले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, नारिंगी गावातील भगतआळी एकविरा मंदिरासमोर येथे राहणारे आरोपी गणपत सखाराम पाटील (६०) हे त्यांची सून प्राची कल्पेश पाटील (२८) हिला सतत शिवीगाळ करत असत. या त्रासाला कंटाळून प्राची हिचा भाऊ विशाल अनंत पाटील (३३) हा गुरुवारी, ३० जुलै रोजी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास आपल्या बहिण प्राची हिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता.

​बहीण माहेरी जात असताना, तिची ८ महिन्यांची मुलगी सासरे गणपत पाटील यांच्या खांद्यावर होती. प्राची पाटील आपल्या लहान मुलीला सासर्‍यांच्या ताब्यातून माहेरी नेण्यासाठी घेऊ लागल्या. मात्र, सासर्‍यांनी मुलीला देण्यास तीव्र विरोध केला. या वादावादीत सासर्‍याने प्राची यांना जोरात धक्का मारला. सासर्‍याने मारलेल्या धक्क्यामुळे प्राची पाटील ही थेट फरशीवर कोसळली त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तातडीने प्राची हिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डोक्याला आतून गंभीर मुक्का मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.

​याप्रकरणी मृत महिलेचा भाऊ विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून बोळींज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०५ (सदोष मनुष्यवध) आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सासरे गणपत पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी त्यांना वसई सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी सांगितले आहे.