वसई: विरारमध्ये गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोन ठिकाणी भीषण आगी लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातली पहिली आग इंडसइंड बँकेला तर दुसरी आग लाकडाच्या गोदामाला लागली होती. आगीच्या या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वारंवार समोर येणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वसई विरार शहरात अलीकडच्या काळात गोदामे, कारखाने तसेच दाटीवाटीने परिसर अशा विविध ठिकाणी आगी लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. दरम्यान विरारमध्ये गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आगीच्या दोन वेगवेगळ्या मोठ्या घटना घडल्या. यातली पहिली घटना विरार पूर्वेतील पिंपळवाडी परिसरातील पुष्प प्लाझा शॉपिंग सेंटरमध्ये घडली. येथील पहिल्या मजल्यावर असलेल्या इंडसइंड बँकेला गुरुवारी (२५ जून) मध्यरात्री ११:३५ च्या सुमारास अचानक आग लागली. स्थानिक नागरिक अनिकेत येलाथे यांनी तातडीने याची माहिती फुलपाडा उप अग्निशमन केंद्राला दिली.

माहिती मिळताच अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाले. बँकेत कपाट आणि लाकडी फर्निचरने पेट घेतल्यामुळे आग वेगाने पसरत होती आणि आत धूर साचला होता. आगीचे गांभीर्य ओळखून आचोळे मुख्य अग्निशमन केंद्रातूनही तातडीने मदत मागवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वप्रथम फायर एक्सच्या (कुऱ्हाड) साहाय्याने बँकेच्या काचा तोडून आतील धूर बाहेर काढला. त्यानंतर होज रील आणि मुख्य वाहनाच्या मॉनिटरचा वापर करून पाण्याचा मारा करत पहाटे २:३० च्या सुमारास आग पूर्णपणे विझवली.

ही आग विझवून अग्निशमन दल परतत नाही तोच, विरार पश्चिमेतील विराट नगर स्मशानभूमीजवळील एका लाकडाच्या गोदामाला शुक्रवारी पहाटे २:२५ च्या सुमारास दुसरी मोठी आग लागली. अरविंद पाटील यांनी या घटनेची वर्दी बोळींज अग्निशमन केंद्राला दिली. गोदामातील लाकडांमुळे अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले. सुरुवातीला बोळींज केंद्राचे वाहन घटनास्थळी पोहोचले. मात्र, आग मोठी असल्याने मदतीसाठी श्रीप्रस्थ उप-अग्निशमन केंद्र आणि आचोळे मुख्य केंद्र येथील आणखी दोन वाहने पाचारण करण्यात आली. तीनही वाहनांच्या साहाय्याने जवानांनी चहूबाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे ४:३० च्या सुमारास ही आग पूर्णपणे आटोक्यात आली.

दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगींमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाल्यामुळे मालमत्ता धारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच या आगी नेमक्या कशामुळे लागल्या, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.