वसई: विरार येथील उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी असतानाही नियमबाह्य पद्दतीने अवजड वाहनांची वाहतूक सुरु आहे. २३ फेब्रुवारी रोजी एक खासगी बस या पुलावरून जात असताना त्या बसचा फोटो काढू पाहणाऱ्या एका जागरूक नागरिकालाच पोलिसांनी धमकावून त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तर फेसबुकवर यासंबंधीची पोस्टही व्हायरल झाली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
विरार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी आहे. त्यासाठी पुलावर उंची कमानीही बसवण्यात आल्या आहेत. मात्र, अनेकदा लहान मालवाहू ट्रक, काही खाजगी बसेस अशा अवजड वाहनांची वाहतूक या पुलावरून सुरु असते. यामुळे अनेकदा वाहने अडकून पडण्याचे, अपघात होण्याचे आणि मध्यंतरी उंची कमान तुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
तर २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:२२ च्या सुमारास अशीच एक घटना घडली. विरार पश्चिम उड्डाणपुलावर MH 48 BM 1722 या क्रमांकाची एक खाजगी बस बंदी असतानाही विरार उड्डाणपुलावरून जात होती. अशा वाहनांमुळे पुलावर वाहतूक कोंडी आणि पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच उद्भवतो. त्यामुळे तिथे उभ्या असणाऱ्या एका नागरिकाने या नियमांच्या उल्लंघनाचा पुरावा म्हणून बसचा फोटो काढला.
पण, तिथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी नियम तोडणाऱ्या बसवर कारवाई करण्याऐवजी, फोटो काढणाऱ्या नागरिकालाच अडवले. वाहतूक पोलिसांनी बसचा फोटो काढणाऱ्या नागरिकाच्या हातातून फोन हिसकावून घेत “फोटो का काढला?” असा जाब विचारला. तसेच त्या नागरिकांच्या गाडीचा फोटोही पोलिसांनी काढला. याप्रकरणी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, स्वतःची चूक आणि कथित भ्रष्टाचार लपवण्यासाठी पोलिसांनी ही कृती केल्याचा आरोप संबंधित नागरिकाने केला आहे.
वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका…
या घटनेनंतर विरारमधील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून नेटकऱ्यांकडून याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावेळी एकाने “पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो काढून व्हायरल करायला हवा होता”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
