वसई: विरार पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर उंची मर्यादा कमानीला टँकर आणि टेम्पोची धडक लागून अपघात घडले आहेत. अचानकपणे उंची मर्यादा कमानी लावण्यात आल्याने त्याचा अंदाज वाहनचालकांना आला नसल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाल्या आहेत.

विरार पूर्व व पश्चिम भागांना जोडण्यासाठी उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. या पुलावरून दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते. या पुलाची क्षमता लक्षात घेता या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तर अवजड वाहनांनी प्रवेश करू नये यासाठी पूर्व व पश्चिम दोन्ही प्रवेश मार्गावर उंची मर्यादा कमानी उभ्या केल्या आहेत.

मात्र काही महिन्यांपूर्वी या उड्डाणपूलावरील उंची मर्यादा कमानी दुरूस्तीच्या कामासाठी काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे या पुलावरून अधूनमधून अवजड वाहनांची वर्दळ सुरूच होती. दुरुस्तीनंतर पुन्हा एकदा लोखंडी उंची मर्यादा कमानी बसविल्या होत्या. मात्र त्या कमानी बसविल्यानंतर याबाबतच्या कोणत्याही पूर्व सूचना न लावल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

त्यामुळे उंचावरून येणाऱ्या वाहनचालकांना समोर कमान आहे याचा अंदाज आला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पाण्याच्या टँकरची धडक बसली. तर त्याच दिवशी अवघ्या काही तासात सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पोची धडक लागली. या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाल्या आहेत.या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर उड्डाणपुलावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

यापूर्वी सुद्धा असाच अपघात घडला होता त्यामुळे सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती असे सामाजिक कार्यकर्ते नारायण घाडी यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर कमानीच्या दोन्ही बाजूने सूचना फलक लावण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.