वसई: विरार मध्ये एका फळविक्रेत्यांकडून रस्त्याच्या कडेला साचलेल्या डबक्यातील पाण्याने फळ धुवून त्यांची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ ही समाज माध्यमावर प्रसारित होत आहे.त्यामुळे नागरिकांमधून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी नाक्यावर ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. येथील जागरूक नागरिक विश्वनाथ शेट्टी यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित फेरीवाल्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत करीत त्याला जाब विचारला.
या नाक्यावर गटाराच्या बाजूलाच साचलेले पाणी होते. ते पाणी घेऊन फळविक्रेता त्या सफरचंद , द्राक्षे याफळांवर शिंपडून ती स्वच्छ केली जात असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. नागरी आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याने याची माहिती 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली, तसेच अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागालाही ही बाब कळवली. मात्र, अन्न औषध प्रशासनाकडून तातडीची कारवाई न करता उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याचा आरोप विश्वास शेट्टी यांनी केला आहे.
विरारमध्ये फळं धुण्यासाठी गटारातील पाण्याचा वापर; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
— LoksattaLive (@LoksattaLive) February 5, 2026
वसई:
विरार मध्ये एका फळविक्रेत्यांकडून रस्त्याच्या कडेला साचलेल्या डबक्यातील पाण्याने फळ धुवून त्यांची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ ही समाज माध्यमावर प्रसारित… pic.twitter.com/ZHlp8c5Nl2
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित फेरीवाल्याला तेथून हाकलून लावले. मात्र, त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई न करता तो दुसऱ्या ठिकाणी फळे विक्रीसाठी गेला असल्याचे सांगण्यात आहे. शहरात जर असे चुकीचे प्रकार सुरू असतील यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती शेट्टी यांनी व्यक्त केली.
सध्या या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

