वसई: विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून शुक्रवारी रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

विरार पश्चिमेतील वाहतुकीचा मुख्य रस्ता असणाऱ्या आणि गृहसंकुलांनी वेढलेल्या ग्लोबल सिटी परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे आणि या खड्ड्यांमध्ये साचणारे पावसाचे पाणी यामुळे वाहनचालकांना अतिशय संथ गतीने या मार्गावरून वाहने चालवावी लागत आहेत. तर दुचाकी आणि चारचाकी वाहनातून दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या खड्डेमय रस्त्यामुळे पाठीच्या, मानेच्या आणि मणक्याच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

वारंवार तक्रार करूनही या रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे शुक्रवारी उपशहर प्रमुख सागर बाळासाहेब साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन पुकारले होते. यावेळी महानगरपालिकेच्या कारभाराचा निषेध करत, रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते खड्डेमुक्त व सुरक्षित करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

तसेच आठ दिवसांच्या आत ग्लोबल सिटी परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून योग्य ती दुरुस्ती करण्यात आली नाही, महानगरपालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.