​वसई:- आजारपण आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात राहणाऱ्या तीन भावंडांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने गुरुवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.

​कुमार मेहता (५०), दीपेश मेहता ( ५२) आणि खेवणा मेहता (४८) अशी आत्महत्या केलेल्या भावंडांची नावे आहेत. हे तिघे विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी येथील ‘गार्डन अव्हेन्यू’ इमारतीच्या डी-विगधील १२०३ क्रमांकाच्या सदनिकेत राहत होते.

गुरुवारी पहाटे सदर फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील रहिवाशांच्या संशय बळावला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पहाटे अडीचच्या सुमारास दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी घरातील तिघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे कुटुंब २०२५ पासून या सदनिकेत भाड्याने राहत होते. तिन्ही भावंडे अविवाहित होती. यातील एका भावाला पॅरालिसिस झाला होता, तर दुसऱ्या भावाला कर्करोग होता. गंभीर आजारपण आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे हे कुटुंब त्रस्त झाले होते.
मृत्यूपूर्वी त्यांनी व्हिडिओ तयार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तिघांनी तीन ते चार दिवसांपूर्वीच विष प्राशन करून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी व्यक्त केला आहे. तिन्ही मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी मृतांच्या बहिणीशी संपर्क साधला असून, त्यांना आर्थिक अडचणी असल्यामुळे त्यांनी आपल्याकडेही पैसे मागितले होते असे तिने पोलिसांना सांगितले असून पुढील तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले.