वसई: विरार पूर्वेच्या भाटपाडा येथे वनविभागाच्या जागेवर सुरू असलेल्या बेकायदेशीर दगड उत्खननाविरोधात महसूल विभागाने शुक्रवारी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दगड वाहतूक करणारे १५ हायवा ट्रक आणि ५ पोकलेन व एक जेसीबी असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वसई विरार मध्ये विविध ठिकाणच्या भागात महसूल विभागाची कोणत्या परवानगी न घेता बेकायदेशीर दगड उत्खनन व त्याची वाहतूक करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई सुरू केली आहे.

नुकताच वसई तालुक्यातील भाटपाडा येथील सर्व्हे नंबर २६/२ या फॉरेस्टच्या जागेत शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे दगड उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड, विरारचे मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी अचानक धाड टाकली. महसूलचे पथक येताच उत्खनन स्थळावर घबराट पसरली आणि वाहनचालकांनी वाहनांतील दगड जागेवरच खाली करून पळ काढला. या कारवाईत महसूल विभागाने अनधिकृत वाहतूक करणारे १५ हायवा ट्रक, ५ पोकलेन मशीन आणि १ जेसीबी असा मोठा साठा जागेवरच जप्त केला आहे.

​प्राथमिक चौकशीत हे बेकायदेशीर उत्खनन माजिद बलोच याच्यामार्फत केले जात असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड यांनी सांगितले आहे.या उत्खननासाठी शासनाची कोणतीही परवानगी नसून, महसूल विभागाने सर्व यंत्रसामग्री जप्त केली आहे. आता दोषींवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ही त्यांनी सांगितले.वसई परिसरात अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा महसूल विभागाने दिला आहे.