वसई : मागील काही वर्षांपासून नालासोपारा मजेठीया येथील नाट्यगृहाचे काम अजूनही अपूर्णच आहे. नोव्हेंबर मध्ये काम पूर्ण होण्याचा मुहूर्त होता तो ही आता हुकला आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या पूर्णत्वाला मुहूर्तच मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या वसईत वर्षभर अनेक सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम होत असतात. नाट्यक्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार ही या शहरात वास्तव्याला आहेत.
मात्र, असे असले तरीही कार्यक्रमांच्या आयोजकांना खाजगी सभागृहांवर किंवा खाजगी महाविद्यालयांच्या सभागृहांवर अवलंबून राहावे लागते. तिथले भाड्याचे दर हे जास्त असल्याने अनेकदा आयोजकांना कार्यक्रम रद्द करावे लागतात. तसेच सुज्ज नाट्यगृह नसल्याने मुंबई-पुण्यातील अनेक नाट्य संयोजक वसईत नाटकाचे प्रयोग करत नाही. त्यामुळे वसईकरांना नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी मुंबईला जावे लागते.
वसई तालुक्यात ही नाट्यगृह तयार व्हावे अशी मागणी येथील नागरिक व कलाकार गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत.याच पार्श्वभूमीवर महापालिकेने नालासोपारा मजेठिया येथे नाट्यगृह तयार करण्यात आहे. मागील पाच वर्षापासून हे काम सुरू आहे. मात्र अजूनही हे काम पूर्णत्वाला गेलेच नाही. जी काही प्रलंबित आहेत पूर्ण करून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दरम्यान सुरू केले जाणार होते.मात्र अजूनही त्याठिकाणी विविध प्रकारच्या त्रुटी असल्याने नाट्यगृहाचे काम पूर्ण होऊ शकले नाही.सद्यस्थितीत आसन व्यवस्था, विद्युत उपकरणे यासह अन्य किरकोळ कामे प्रलंबित असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
डिसेंबर अखेरपर्यँत पूर्णत्वाचे आश्वासन
विरारमध्ये आयोजित जनता दरबार दरम्यान पालकमंत्री गणेश नाईक यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहरातील काही प्रकल्पांची पाहणी केली. यात नालासोपाऱ्यातील मजेठिया नाट्यगृहाची पाहणी केली.यावेळी बोलताना पालिकेकडून सभागृहात बांधण्यात आलेला रंगमंच अतिशय लहान असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच हा नाट्यगृह नसून मिनी थिएटर आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. पालिका अधिकाऱ्यांनी येत्या दीड महिन्यात नाट्यगृहाचे काम पूर्ण केले जाईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अंती नाट्यगृहाचे उद्घाटन केले जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
सरावाला व नाट्यप्रयोगासाठी अडचणी
वसई विरार शहरात १५ ते २० नाटकांचे समूह आहेत. या समूहामध्ये वेगवेगळे अडीचशे ते तीनशे तरुण कलावंत आहेत, नाशिवाय वरिष्ठ कलाकार वेगळे आहेत. मात्र या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी आवश्यक असणारी पार्श्वभूमी येथे नाहीत. वसई, विरार शहरात एकही व्यवसायिक नाट्यगृह नाही. त्यामुळे या कलाकारांना सराव करण्यासाठी तसेच आपले प्रयोग सादर करण्याची संधी मिळत नाही. नाट्यगृहाची सोय नसल्याने सरावाला अडचणी येतात.
