वसई: वसई विरार मधील विविध ठिकाणच्या जंगलपट्ट्यात आगी लागण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.रविवारी पुन्हा एकदा जीवदानी डोंगर परीसरात जंगलात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.आगीमुळे मोठी खळबळ उडाली असून वन्य जीवांना धोका निर्माण झाला आहे. वसई विरार पूर्वेच्या भागात मोठ्या प्रमाणात जंगलपट्टा आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीत येतो.
उन्हाळा सुरू होताच जंगलात आगी लागण्याच्या घटना समोर येत असतात. रविवारी विरार पूर्वेच्या जीवदानी डोंगरावर आग लागल्याची घटना घडली.अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. डोंगरावर उगवणारे गवत, झाडे झुडपे तसेच मोठ्या वृक्षांच्या फांद्या, अशाप्रकारची वनसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहे. तर डोंगरावर लागलेली आग वेगाने पसरत असल्यामुळे डोंगरावरील प्राणी आणि पक्ष्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
रविवारी सकाळपासून आग लागली आहे मात्र हवेचा वेग असल्याने अजूनही आग सुरूच असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.याबाबत नागरिकांनी वन विभागाला माहिती कळविली आहे असे नागरिकांनी सांगितले.या लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली आहे. सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे अभयारण्यातील प्राण्यांसह वनसंपदेला हानी पोहचत असून रानात अधिवास असणाऱ्या पशु पक्षी व प्राण्यांवर संकट ओढवले आहे तर दुसरीकडे रानमेव्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठी भाषा दिनी पोलिसांचा स्तुत्य उपक्रम; जप्त केलेली २.१८ कोटींची मालमत्ता मूळ मालकांना केली परत
याआधीच अतिक्रमण, प्रचंड लाकूडतोड यामुळे येथील जंगलपट्टा हळूहळू नष्ट होऊ लागला आहे. त्यातच आता जंगलाला आगी लागण्याचे प्रकार सुरू झाल्याने निसर्गसंपन्न असलेला जंगल परिसर नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. या जंगलाला प्राण्यांची शिकार व लाकूडफाटा जमा करण्यासाठी आगी लावल्या जात संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावर वनविभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शिकारी साठी आगी
उन्हाळा सुरू होताच वसईच्या विविध ठिकाणच्या जंगलपरिसरात आगी लागण्याचे प्रकार समोर येत असतात. पूर्वी घनदाट जंगल असल्याने झाडांच्या घर्षणाने ठिणग्या बाहेर पडून वणवे पेटत होते. परंतु आता लागणारे वणवे हे मानवनिर्मित असून वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी डोंगर माथ्याच्या सभोवताली वणवे पेटविले जात असल्याचा संशय पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे. अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
