वसई: विरार पूर्वेच्या कुंभार पाडा तलावात पोहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. अभिषेक महेंद्र राजभर असे या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी आपल्या मित्रांच्या सोबत पोहायला गेली असताना ही घटना घडली आहे.
विरार पूर्वेच्या कुंभार पाडा येथे तलाव आहे. पाऊस सुरू झाला असल्याने तलावात ही चांगल्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक जण या तलावाच्या ठिकाणी फिरण्यासाठी व तलावात पोहण्यासाठी येत असतात. गुरुवारी सायंकाळी अभिषेक हा त्याच्या मित्रांच्या सोबत या तलावावर पोहण्यासाठी गेला होता.
पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र, परिसरात होणारा मुसळधार पाऊस, तलावाची वाढलेली जलपातळी आणि रात्रीचा अंधार यामुळे बचाव पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर सुरक्षेच्या कारणास्तव रात्री ही शोधमोहीम थांबवावी लागली.
शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून पुन्हा शोध मोहीम सुरू करून पाण्यात बुडालेल्या अभिषेक याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विरार पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
या दुर्घटनेनंतर वसई-विरार महापालिका आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने नागरिकांना, विशेषतः तरुणांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात आणि मुसळधार पावसामुळे तलाव, नद्या, धरणे किंवा इतर धोकादायक ठिकाणी पोहायला जाऊ नये किंवा तिथे गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
