​वसई: विरारमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बेकायदेशीर गुटखा विक्रीवरून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची गुटखा विक्रेत्याशी जोरदार झटापट झाल्याची घटना घडली आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, विरारमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, विरार परिसरात रात्री उशिरा बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री केली जात होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एमएसएफच्या जवानांनी संबंधित विक्रेत्याला याबाबत जाब विचारला. मात्र, विक्रेत्याने नरमाईची भूमिका घेण्याऐवजी जवानांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या शाब्दिक वादाचे रूपांतर मोठ्या झटापटीत झाले.
​

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एमएसएफ जवान आणि गुटखा विक्रेता यांच्यात तीव्र वाद सुरू असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या वादादरम्यान त्या इसमाने थेट एमएसएफ जवानाची कॉलर पकडल्याचेही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. शासकीय सुरक्षा रक्षकावर अशा प्रकारे हात टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

​नागरिकांमध्ये संताप आणि विविध चर्चा

​या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर विरार परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्यात गुटखा विक्रीवर कायदेशीर बंदी असतानाही विरारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा येतोच कसा? आणि तो रात्री उशिरापर्यंत सर्रास कसा विकला जातो? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या बेकायदेशीर धंद्यांना स्थानिक पोलिसांचे अभय आहे का, अशीही चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

​कडक कारवाईची मागणी

​या संपूर्ण प्रकरणाची सोशल मीडियावर गंभीर दखल घेतली जात असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि वस्तूस्थिती काय आहे ती समोर आणावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. तसेच, विरारमधील बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यांवर आणि सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विरार पोलीस ठाण्यात गुन्हा

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची कॉलर पकडून दमदाटी करणाऱ्या व्यक्तीला विरार पोलिसांनी अटक केली आहे. मनिष संजय झा असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३२, ११५(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल एम तुरे यांनी सांगितले आहे.