वसई: विरार – नालासोपारा बायपास रस्त्यावर सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. नुकताच भरधाव वेगाने येणाऱ्या दोन चारचाकी वाहनांची धडक लागून भीषण अपघात घडल्स होता. या अपघाताच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठीकठिकाणी गतीरोधक तयार करण्यात आले आहेत.

नालासोपारा पश्चिमेच्या श्रीप्रस्थ ते विरारच्या म्हाडा कॉलनी दरम्यान पालिकेने नवीन रस्ता तयार केला आहे. यासाठी पालिकेने ८ कोटी रुपये खर्च करून १५ मीटर रुंद आणि १६०० मीटर लांब रस्ता तयार करण्यात आला आहे. या तयार करण्यात आलेल्या रस्त्यामुळे विरार ते नालासोपारा या दरम्यानचा प्रवास अवघ्या पाच ते आठ मिनिटांत करणे शक्य झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे.

मात्र काही वाहनचालक या रस्त्यावरुन भरधाव वेगाने वाहने चालवित आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना ही घडत आहेत. विशेषतः यापूर्वी महापालिकेने वेग मर्यादेसाठी रबरचे गतिरोधक बसविले होते. मात्र अवघ्या वर्षभरात त्याची दुरवस्था झाली होती.

नुकताच या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक लागून भीषण अपघात घडला होता. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील एकूण पाच जण जखमी झाले होते. या विचित्र अपघातामुळे या रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने दुरवस्था झालेले गतिरोधक काढून त्याठिकाणी आता डांबरीकरण करून गतिरोधक तयार करण्यात आले आहेत.