वसई:- दहीहंडी उत्सवानंतर नवापूर येथे पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील महिला गोविंदा पथकातील काही सदस्यांचा विरार पश्चिम, वटार येथील मनवेल पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांसोबत वाद झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या झालेल्या वादातून पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याने यात तो गंभीर जखमी झाला आहे.
शनिवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडला यातील मुंबईच्या एका महिला गोविंदा पथकाने ही सहभागी होत दहीहंड्या फोडल्या. अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवार पथकातील महिला सदस्य लहान मुल व जेष्ठ नागरिक यांना घेऊन नवापूर येथील राजहंस रिसॉर्ट मध्ये सहलीसाठी आले होते. दिवसभर मौज मज्जा केल्यानंतर केल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास या महिला मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले.
परतीच्या प्रवासादरम्यान बसमध्ये डिझेल भरण्यासाठी विरार पश्चिमेतील वटार येथील मनवेल पेट्रोल पंपावर बस थांबविण्यात आली. यावेळी बसमधून बिस्कीटचे रिकामे पाकीट बाहेर फेकण्यात आले. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने संबंधित महिलांना कचरा बाहेर न टाकता तो उचलण्यास सांगितले. यावरून बसमधील महिलांचा कर्मचाऱ्यासोबत वाद झाला.
त्यानंतर बसमधील काही महिला खाली उतरून त्या कर्मचाऱ्याला जाब विचारला याच दरम्यान कर्मचाऱ्यासोबत धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येते.परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पेट्रोल पंपाचे मालक यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही काळ परिस्थिती शांत झाली. मात्र, काही वेळाने बसमधील एका तरुणाने संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कर्मचारी जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्याने पेट्रोल पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी बसची चावी काढून घेत पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सुमारे दोन तास परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या प्रमाणात परिसरातील ग्रामस्थ ही यावेळी जमा झाले. पेट्रोल पंपावर दाखल झालेल्या पोलिसांनी मध्यस्थी करून जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, बसमधील एका ज्येष्ठ नागरिकाला पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने अयोग्य भाषेत बोलल्याने हा वाद झाल्याचा दावा महिला गोविंदा पथकातील सदस्यांनी केला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
