वसई:- वसई-विरार शहरात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, इंधन (पेट्रोल) टंचाईमुळे वाहनचालकांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. मुसळधार पाऊस आणि पूरसदृश परिस्थितीमुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद झाले होते किंवा पाण्यात बुडाले होते, ज्यामुळे पेट्रोल मिळणे कठीण झाले होते.
सध्या विरार पूर्व येथील काही मोजक्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध असल्याने, मोठ्या संख्येने वाहनचालक तिथे गर्दी करत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत पोहोचल्या आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना आपली वेळ येण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागली.
पेट्रोल पंपांच्या आजूबाजूला झालेली प्रचंड गर्दी आणि वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. रस्त्यांवर वाहनांची संख्या अचानक वाढल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.
पावसामुळे आधीच जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि आता या इंधन संकटामुळे आमच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर नियमित पुरवठा सुरू करावा, जेणेकरून वाहनचालकांना दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
