विरार विषबाधा प्रकरणातील गूढ कायम ; जखमी मुलीला उपचारासाठी मुंबईला हलवले

मांडवी पोलिसांनी घरातील डाळ, तांदूळ, पीठ आणि इतर अन्नधान्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

विरार विषबाधा प्रकरणातील गूढ कायम ; जखमी मुलीला उपचारासाठी मुंबईला हलवले
रात्री अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाला होता.

वसई  :  विरारमधील विषबाधा प्रकरणातील दोन मुलांवर वसई-विरार महापालिकेच्या पालिका रुग्णालयात उपचार सुरू असून एका मुलीला उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाला होता. जेवणातून विषबाधा झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते; पण मुलांच्या आईने मृत मुलांपैकी एकाने जेवण केलेच नसल्याचे डॉक्टरांना सांगितले आहे. यामुळे विषबाधा नेमकी कशाने झाली असावी याचा तपास पोलीस तपास करत आहेत.  

मांडवी परिसरातील कण्हेर येथील नालेश्वर नगर येथे राहणाऱ्या रिक्षाचालक अशफाक खान याच्या घरात शुक्रवारी रात्रीच्या जेवणानंतर मध्यरात्री अचानक त्यांच्या पाचही मुलांच्या पोटात दुखायला लागले आणि त्यांना उलटय़ा सुरू झाल्या होत्या. या मुलांना महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान आसिफ खान (५) आणि फरीन खान (७) या दोघांचा मृत्यू झाला, तर इतर फराना खान (१०), आरिफ खान (४), साहिल खान (४) या तीन मुलांवर महापालिकेच्या तुळींज रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान आईलासुद्धा उलटय़ा झाल्याने तिलाही उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, तर उपचार घेत असलेल्या एका मुलीची प्रकृती अधिक बिघडल्याने तिला उपचारासाठी मुंबईतील वाडिया रुग्णालयात हलविण्यात आहे.

मांडवी पोलिसांनी घरातील डाळ, तांदूळ, पीठ आणि इतर अन्नधान्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत.  मृत मुलांचे विसेरा जतन करण्यात आला आहे.  परिमंडळ ३ चे सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी माहिती दिली की, सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली  आहे. कुटुंबाची संपूर्ण माहिती घेण्याचे काम सुरू आहे.  अहवाल आल्यानंतर विषबाधा कशाने झाली हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virar poisoning case remains a mystery zws

Next Story
मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी ठेकेदार मिळेना ; निविदा प्रक्रियेतील अटी आणि तरतुदी शिथिल करणार
फोटो गॅलरी