वसई : वैतरणा आणि विरार स्थानकांच्या दरम्यान गुरुवारी सकाळी एक भीषण रेल्वे अपघात झाला. नारंगी रेल्वे फाटकाजवळ वळसाड-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजरखाली एक महिला आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

​​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९:३० च्या सुमारास वळसाड-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर विरारच्या दिशेने येत असताना नारंगी फाटकाजवळ हा अपघात घडला. एक अज्ञात महिला या ट्रेनखाली आली. अपघाताची भीषणता पाहून ट्रेन चालकाने गाडी तात्काळ थांबवली.​घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.

या अपघातामुळे वळसाड एक्सप्रेस बराच वेळ जागेवरच थांबून होती. याचा थेट फटका मुंबईच्या दिशेने येणाऱ्या इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांना आणि चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनला बसला. ऐन गर्दीच्या वेळी गाड्यांचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मिरारोड ते वैतरणा दरम्यानचा चालू वर्षात ९३ जणांचा अपघाती मृत्यू आहे. रेल्वे रूळ ओलांडून जाण्याच्या प्रकारामुळे अधिक अपघात घडत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.