वसई : सुट्टीचा आनंद घेण्यासाठी विरार जवळील एका प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये आलेल्या पर्यटकांना रिसॉर्ट कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचा सामना करावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून पर्यटक आणि रिसॉर्ट कर्मचाऱ्यांमध्ये वाद पेटला. या वादाचे पर्यावसान पुढे तुंबळ हाणामारीत झाले. या थरारक हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मागील काही वर्षात वसई विरार शहराच्या समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट उभे राहिले आहेत. वसई गाव, भुईगाव, कळंब, राजोडी, अर्नाळा, नवापूर, वटार, वासलई, गिरिज, रानगाव, तसेच पूर्वेकडील भालीवली, तिल्हेर, वज्रेश्वरी, कौलार अशा भागात शेकडो रिसॉर्ट उभारण्यात आली आहेत. किनार पट्टीचा परिसर निसर्गरम्य असल्याने या भागात मुंबई, ठाणे, पालघर यासह अन्य भागातून पर्यटक येऊ लागले आहेत.

नुकताच विरार नवापूर येथील एका रिसॉर्टमध्ये पर्यटनासाठी काही पर्यटक आले होते. यावेळी तेथील कर्मचारी आणि पर्यटन यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता.मात्र काही क्षणातच कर्मचारी आणि पर्यटक यांच्या तुंबळ हाणामारी झाली आहे. यात हातात प्लास्टिक बिस्लेरी पाण्याचा बाटला, प्लास्टिक खुर्च्या तसेच ठोशा बुक्क्यांनी मारहाण करीत असल्याचे व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. यात एकजण चेहऱ्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले.

या घटनेची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने रिसॉर्ट मध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.मागील दोन वर्षांपूर्वी सुद्धा नवापूर येथील एका रिसॉर्ट मध्ये वाहनांची रिक्षाला धडक लागल्याने वाद झाला होता.

याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. २ जून ला ही घटना घडली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले आहे.