वसई:- वसईच्या ऐतिहासिक वारशाची ओळख असलेल्या प्राचीन वास्तू आज दगडखाण माफियांच्या विळख्यात सापडल्याचे धक्कादायक वास्तव विरार पूर्वेच्या शिरगावजवळील गडगापाडा परिसरात समोर आले आहे. नुकताच या परिसरात आत्माराम पाटील या ग्रामस्थाची निघृण हत्या झाली त्याच ठिकाणी सुमारे ४८९ वर्ष जुनी ऐतिहासिक ‘पिंज्याची माडी’ उभी असून तिच्याच पायथ्याशी बेकायदेशीर दगडखाण सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विरार पूर्वेच्या भागात शिरगाव गडगापाडा परिसर आहे. या ठिकाणी पोर्तुगीज काळात या परिसरावर नजर ठेवण्यासाठी आणि रखवालदारीसाठी ही माडी बांधण्यात आली होती. वसईच्या ऐतिहासिक संरक्षण व्यवस्थेचा ती एक महत्त्वाचा भाग मानली जाते. जवळपास ही माडी पंधराव्या ते सोळाव्या शतकातील असून १७३७ ते १७३९ दरम्यान मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसईचा ताबा घेतल्यानंतर ही वास्तू मराठा साम्राज्याच्या नियंत्रणाखाली आली असल्याचे इतिहास अभ्यासकाकडून सांगण्यात येत आहे.
मात्र या ऐतिहासिक वास्तूच्या देखभालीकडे व ती संरक्षित करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच या ऐतिहासिक पिंज्याच्या माडीच्या आसपास मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दगड उत्खननामुळे परिसरातील डोंगर पोखरले जात असून वारसा वास्तूलाही धोका निर्माण झाला आहे. सततच्या स्फोटांमुळे परिसर हादरत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
याच दगडखाणीत सुरू असलेल्या बेकायदा उत्खननाच्या विरोधात आवाज उठवणारे ग्रामस्थ आत्माराम पाटील यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. त्यामुळे दगडखाण माफियांची दहशत आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुरातत्व विभागात नोंद आवश्यक
यापूर्वी शिरगाव परिसरातून केळवे, माहीम, सफाळे अशा भागात याच डोंगर- दऱ्यातून वाहतूक होत होती. त्यावर देखरेख ठेवणे व आजूबाजूच्या परीसरात घडणाऱ्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने ही माडी उभारली होती.
मात्र याकडे लक्ष न दिल्याने या वास्तूची दयनीय अवस्था झाली असल्याचे इतिहास संशोधक श्रीदत्त राऊत यांनी सांगितले आहे. विशेषतः याची नोंद ही पुरातत्व विभागात होणे आवश्यक होते तशी नोंद न झाल्याने अशा प्राचीन कालीन वास्तू बिकट अवस्थेत आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.
या वास्तू बाबत केंद्रीय पुरातत्व विभागात कोणत्याही प्रकारची नोंद नाही असे पुरातत्व विभागाचे अधिकारी कैलास शिंदे यांनी सांगितले आहे. याबाबत राज्य पुरातत्व विभाग यांच्याकडे ही माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पुरातत्व समितीच नाही
वसई तालुक्यात आजही विविध ठिकाणच्या भागात अशा इतिहासाच्या साक्ष देणाऱ्या अनेक पाऊल खुणा आहेत. शीलालेख, ऐतिहासिक माड्या, स्मारके आहेत. मात्र या ऐतिहासिक वास्तूंच्या नोंदी नाहीत त्यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत. या वास्तूंचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात पुरातत्व समिती तयार होणे आवश्यक आहे असे इतिहास संशोधक श्रीदत्त राऊत यांनी सांगितले आहे.
