वसई:- विरार येथील बहुप्रतीक्षित क्रीडा संकुल आणि नाट्यगृहाच्या उद्घाटनावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. क्रीडा संकुल आणि नाट्यगृहाचे उद्घाटन संपूर्ण नियमांचे पालन करून आणि प्रशासनाशी चर्चा करूनच आयोजित करण्यात आले होते, असा दावा महापौर अजीव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा भाजपचा आरोप फेटाळत, विरोधकांनी खासदार आणि मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली आणि प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोपही महापौरांनी यावेळी केला.
वसई-विरार महापालिकेच्या बोळींज येथील क्रीडासंकुल व नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या श्रेयावरून शनिवारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि बहुजन विकास आघाडी (बविआ) यांच्यात वाद निर्माण झाला होता. यावेळी क्रीडासंकुलात भाजपने तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन करत सत्ताधारी बविआने कोणत्याही प्रकारचा प्रोटोकॉल न पाळताच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
या घडलेल्या घडामोडीनंतर महापौर अजीव पाटील यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत भाजपने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. क्रीडा संकुल आणि नाट्यगृहाच्या चौकशीनंतरच त्याचे उद्घाटन करण्याचे महापालिका प्रशासन आणि त्यांचे ठरले होते. त्यादृष्टीने त्यांनी स्वतः आयुक्तांसोबत या वास्तूंची पाहणीही केली होती. सर्वांना प्रोटोकॉलनुसार निमंत्रण देण्याचे निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी आयुक्तांना बुलेट ट्रेनच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जावे लागल्यामुळे, अतिरिक्त आयुक्त आणि प्रशासनाशी चर्चा करून महापौरांच्या स्वाक्षरीने निमंत्रण पत्रिका पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांना सन्मानाने आम्ही पत्र पाठवून निमंत्रण दिले होते.
असे असतानाही, भाजपने कोणतीही चर्चा न करता अचानक प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत आक्षेप नोंदवला. “जी आर (शासकीय निर्णय) म्हणजे कायदा नाही, आम्ही सर्वांना सन्मानाने बोलावले होते,” असे महापौरांनी स्पष्ट केले. तसेच, एकीकडे काम अपूर्ण असल्याचे सांगणारे विरोधक आंदोलन झाल्यानंतर स्वतः कसं काय उद्घाटन करतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरार येथील बोळींज क्रीडासंकुलाच्या लोकार्पणावरून विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप वस्तुस्थितीला धरून नसून, शहराच्या विकासकामाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असल्याचे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले.जेव्हा वसई विरार शहरात भाजपने विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटने केली तेव्हा त्यांनी प्रोटोकॉल पाळला होता का ? असा सवाल ही त्यांनी भाजपला केला आहे.
अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई
क्रीडा संकुल व नाट्यगृहाच्या उद्घाटनांवरून महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची अधिकृत भूमिका स्पष्ट न केल्याने नागरिकांमध्ये ही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने आपली भूमिका मांडली नसल्याने इतका वाद निर्माण झाला का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता. त्याला उत्तर देताना महापौरांनी सांगितले की प्रशासन कुठेही कमी पडलेले नाही, जर का प्रशासनाच्या चुकीमुळे हा वाद निर्माण झाला असेल असे निदर्शनास आले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही महापौर अजीव पाटील यांनी दिला आहे.
