वसई: विरार रेल्वे स्थानक ते द्वारकाधीश मंदिर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर या मागणीची दाखल घेत भाविकांच्या सोयीसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे.
विरार पूर्वेतील शिरगाव येथे प्रति द्वारकाधीश मंदीर उभारण्यात आले आहे. मूळ मंदिरांप्रमाणे कोणत्याही लोखंडी सळी किंवा साच्याचा वापर न करता बन्सी पहाडपूर दगड वापरून ९० फूट उंचीचे हे मंदिर इंटरलॉक पद्धतीने नागरशैलीत बांधण्यात आले आहे. तसेच मूळ मंदिराप्रमाणे ५२ गजांची ध्वजा, ५६ पायऱ्या यामुळे गुजरातीमधील द्वारकेत असणाऱ्या द्वारकाधीश मंदिराची प्रतिकृती असल्याने स्थानिक नागरिकांसह इतर भागातील भावीकांमध्येही या मंदिराबाबत आकर्षण निर्माण झाले आहे.
त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र, विरार रेल्वे स्थानक ते द्वारकाधीश मंदिर अशी दळणवळणाची पुरेशी साधने उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेकडून नियमित बससेवा सुरू केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. तसे निवेदनही माजी परिवहन समिती सदस्य वसंत वरे यांनी पालिका प्रशासनाला दिले होते.
नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेत शुक्रवार, १ मे रोजी विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पहिली बस विरार पूर्व येथून असेल व द्वारकाधीश मंदिर शिरगांव येथून विरार रेल्वे स्थानकात जाण्यासाठी शेवटची बस रात्री १० वाजून ५० मिनिटांनी असेल. अर्ध्या तासाच्या अंतराने ही बससेवा महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने भाविकांच्या सोईसाठी सुरु केली आहे.
या नव्या बससेवेचे उद्घाटन उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी नगरसेविका ममता सुमन, अमृता चोरघे, जीनत शेख, नगरसेवक नरेंद्र पाटील, माजी नगरसेविका मीनल पाटील, हेमंगी पाटील आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
