वसई: होळी हा आनंदाचा आणि जल्लोषाचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीनंतर मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा दुसरा मोठा सण. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या रूढी -परंपरांनुसार होळीचा सण साजरा केला जातो. तर विरारच्या कोळी बांधवांकडूनही एक अनोखी परंपरा पाळली जाते. या परंपरेनुसार दरवर्षी होलिका दहनासाठी लागणारे वृक्ष विरारमधून लोकल ट्रेनच्या डब्याला बांधून मुंबईतील माहीम येथे नेले जाते. सोशल मीडियावर या परंपरेची माहिती देणारा एक व्हायरल व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.
मुंबईतील माहीममध्ये मोरी हा परिसर आहे. या भागात कोळी बांधवांची मोठी वस्ती होती. पण, कालांतराने या भागातील चाळी तोडण्यात आल्या आणि त्या ठिकाणी मोठ्या, टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. या काळात या परिसरात राहणारे अनेक कोळी बांधव माहीममधून विरारला स्थलांतरित झाले आणि कायमचे याच भागात स्थायिक झाले.
पण, त्यानंतरही त्यांची माहीमशी आपल्या मुळाशी असलेली नाळ तुटलेली नाही. त्यामुळे ब्रिटिशकाळापासून होळीच्या दिवशी एक अनोखी परंपरा कोळी बांधवांकडून पाळली जात आहे. होलिका दहनासाठी सुपारीचे झाड वापरले जाते. या झाडाला धार्मिक महत्त्व असल्यामुळे झाडाला हळद आणि कुंकू वाहून, मग ते कापून, आणि नीट बांधून होलिका दहनासाठी नेले जाते.
विशेष, म्हणजे माहिमच्या मोरी गावातील कोळी बांधवांचा हा मान असतो. त्यामुळे विरारमधून हे सुपारीचे झाड कापून दहनासाठी नेले जाते. त्यासाठी आधी पारंपरिक पद्धतीने खांद्यावरुन ते विरार रेल्वे स्थानकात आणले जाते. त्यानंतर ते झाड लोककला आडवे बांधून माहीमपर्यंत नेले जाते आणि माहिमला उतरल्यानंतर पुन्हा वाजतगाजत खांद्यावर नाचवत ते झाड मोरी गावात नेले जाते.
गेल्या अनेक वर्षांपासून, पिढ्यानपिढ्या ही पद्धत चालत आली आहे. दरवर्षी होलिकोत्सव याच पद्धतीने साजरा केला जातो. तर यासाठी संबंधित अधिकारी, रेल्वे कर्मचारीही मदत करतात, अशी प्रतिक्रिया मोरी गावातील रहिवाशांनी दिली आहे.
