वसई: विरार पूर्वेकडील कारगिल नगर परिसरात उभारण्यात आलेल्या वारकरी संप्रदाय आणि विठ्ठलाच्या शिल्पाला सध्या अस्वच्छतेने वेढले असून, या पवित्र वास्तूच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. महापालिकेच्या या दुर्लक्षामुळे वारकरी भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून पालिकेच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

​वसई-विरार महानगरपालिकेने तीन-चार वर्षांपूर्वी शहरातील कचराकुंडी मुक्त मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी सुशोभीकरण करून सांस्कृतिक शिल्पे उभारली होती. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कारगिल नगर येथील मुख्य रस्त्यावर वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेले शिल्प बसवण्यात आले. मात्र, देखभालीच्या अभावामुळे आज या शिल्पाची दुर्दशा झाली आहे. परिसरातील फेरीवाले, हॉटेल चालक आणि लघुउद्योजक सायंकाळच्या सुमारास याच शिल्पाच्या ठिकाणी कचरा आणून टाकत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

​सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या पवित्र शिल्पाच्या विटंबनेमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या जात आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असतानाही, प्रत्यक्षात मात्र कचरा व्यवस्थापनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. पालिकेने या ठिकाणची तातडीने स्वच्छता करावी आणि परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.