वसई:- वसई-विरारमध्ये विविध पद्धतीने होळी साजरी केली जात आहे. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तर काही ठिकाणी सामाजिक विषयांवर आधारित संकल्पना राबवत होळी साजरी करण्यात येत आहे.

मागील काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. विविध मार्गाने सायबर क्राईम द्वारे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊ लागली आहे. अशा प्रकारच्या फसणूकीपासून नागरिकांनी जागरूक व्हावे यासाठी विरार येथील तरुणांनी अनोख्या पद्धतीने होळीउत्सव साजरा केला आहे. विरार पश्चिम येथील चाणक्य उत्कर्ष मंडळातर्फे यंदा सायबर क्राईम या वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी विशेष ‘राक्षस’ तयार करण्यात आला आहे. ऑनलाईन फसवणूक, क्रेडिट कार्ड द्वारे होणारी फसवणूक आणि डिजिटल माध्यमातून होणारे गुन्हे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर सायबर गुन्हे करणाऱ्या प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून हा राक्षस साकारण्यात आला आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून मंडळाकडून अशाच प्रकारे विविध सामाजिक विषयांवर आधारित राक्षस बनवून होळीच्या माध्यमातून समाजातील वाईट प्रवृत्ती जाळण्याचा संदेश दिला जात आहे. यापूर्वी महिलांवरील अत्याचार आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांविरोधात राक्षस तयार करण्यात आला होता. तसेच डासांमुळे होणाऱ्या आजारांवर जनजागृती करण्यासाठी ‘डासांची होळी’ साकारण्यात आली होती. कोरोना काळात ‘कोरोना राक्षसा’चे दहन करून जनतेला सावध राहण्याचा संदेश देण्यात आला होता.

यंदाच्या संकल्पनेत सायबर क्राईम मेंदूवर परिणाम करतो आणि लोकांना मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रस्त करतो, हे दाखवण्यासाठी डोक्याच्या आकारात संगणकाच्या माऊसची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हा राक्षस तयार करण्यासाठी हजारो पेपर प्लेट्स, कागद आणि काट्यांचा वापर करण्यात आला असून जवळपास पंधरा दिवसांपासून त्याची निर्मिती सुरू होती. ही संपूर्ण संकल्पना मंडळाच्या सर्व सदस्यांची असून सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले.

“दरवर्षी आम्ही होळीच्या माध्यमातून समाजातील एखाद्या ज्वलंत विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. सध्या सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लोक ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशा गुन्ह्यांपासून दूर राहावे, हा संदेश देण्यासाठी आम्ही ही थीम साकारली आहे.” – आयुष सुर्वे, सदस्य – चाणक्य उत्कर्ष मंडळ

होळीत वाईट प्रवृत्ती किंवा विचार जाळायची पद्धत आहे. आज आपण कलियुगात आहोत आणि आपल्यासमोर सायबर स्कॅमचा मोठा राक्षस उभा राहिला आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचा विचार ज्यांच्या डोक्यात आहे. तो जाळण्याचा प्रयत्न आज आपण इथे केला आहे. ओटीटी किंवा कोणत्या माध्यमाची प्रसिद्धी करण्यासाठी मी इथे उभा नाही. तर जी विकृत प्रवृत्ती तयार झाली आहे. तिला जाळण्यासाठी आज वसई विरारचे तरुण एकत्र आलो आहोत आणि सालाबाद प्रमाणे उत्कर्ष युवक मंडळाने प्रतीकात्मक होळी तयार केली आहे. – हार्दिक राऊत, माजी नगरसेवक

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विविध थीमवर आधारित प्रतिकात्मक होळी तयार करत आहोत. आपल्या देशातील सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. दररोज विविध प्रकारचे गुन्हे आपल्या कानावर येत असतात. त्यामुळे आपण एकत्र येऊया आणि सायबर गुन्ह्यापासून स्वतःला वाचवूया. – कार्यकर्ता, उत्कर्ष युवक मंडळ,