वसई: विरार येथील भुयारी मार्गाजवळ (सबवे) असलेल्या जिल्हा परिषद उर्दू माध्यम शाळेच्या आत अनधिकृत फेरीवाल्यांकडून माळ साठवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठी एकीकरण समितीच्या अधिकृत पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हायरल व्हिडिओमुळे प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उजेडात आला आहे.

वसई विरार शहरात मागील काही वर्षात रस्त्यावर सामानाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली असल्यामुळे रस्ते, रेल्वे स्थानक तसेच वर्दळीच्या भागात बस्तान मांडणाऱ्या फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळे पालिकेकडून या फेरीवाल्यांवर अधूनमधून कारवाई करण्यात येते. या कारवाई दरम्यान फेरीवाल्यांकडील सामान जप्त करण्यात येते.

त्यामुळे कारवाईतून वाचण्यासाठी आणि माल सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकदा फेरीवाले विविध ठिकाणी स्वतःकडचे सामान लपवून ठेवतात. पण, आता चक्क या फेरीवाल्यांकडून विक्रीचे सामान साठवण्यासाठी विरारमधील उर्दू माध्यम जिल्हा परिषद शाळेच्या जागेचा वापर केला जात आहे.

एकीकडे शहरातील जिल्हापरिषद शाळांची अवस्था बिकट असताना दुसरीकडे त्या आता माल साठवणुकीसाठी त्याचा वापर केला जात असल्यामुळे महापालिका, जिल्हापरिषद आणि शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मराठी एकीकरण समितीच्या अधिकृत पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून, “विरार भुयारी मार्गाजवळील जिल्हा परिषद उर्दू माध्यम शाळेत परप्रांतीय अनधिकृत फेरीवाल्यांचा माल साठवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शैक्षणिक संस्थांचा अशा प्रकारे गैरवापर होत असेल, तर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी”, अशी मागणीही त्यांनी केली आहे.