विरार : शहरातील नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून बांधलेल्या इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. यासाठी आयुक्तांनी सर्व प्रभाग समितींना आपल्या परिसरातील अशा इमारतींचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. वसईतील बाभोळा येथील तांदूळ बाजार या इमारतीमुळे परिसरातील गावांमध्ये जलसंकट आल्याने ती इमारतीदेखील कायदेशीर प्रक्रिया करून जमीनदोस्त केली जाणार आहे. 

वसई विरार शहराला मागील काही वर्षांपासून पुराचा फटका सहन करावा लागत आहे. त्यात पालिकेकडून नालेसफाई केली असतानाही अनेक ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण करून त्यावर बांधकामे केली आहेत. यामुळे नाल्याचे पात्र कमी होऊन पाण्याच्या निचरा होताना अडचणी निर्माण होतात. यावर्षी आयुक्तांनी नाल्यांची पाहणी केली असताना अनेक ठिकाणी नाल्यावर छोटी मोठी बांधकामे करून नाले बंदिस्त केल्याचे आढळून आले आहे.  वसई विरारमध्ये एकूण २०५ नाले असून यातील अनेक मुख्य आणि उपनाल्यावर अतिक्रमणे झाली आहेत.  यामुळे मुख्य प्रवाहातील नाले बंदिस्त झाल्याने पावसाळय़ात पुराचा सामना करवा लागत आहे.

अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच कायेशीर कारवाई करून ही अतिक्रमणे हटवली जातील, असे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.

न्यायालयाला माहिती दिली नसल्याचा आरोप 

वसई पश्चिमेचा बाभोला येथे नाल्यावर तांदूळ बाजार इमारत उभी आहे. या इमारतीमुळे नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग अडल्याने परिसरातील चुळणा, सालोली, गिरीज, सांडोर, बंगली आदी गावे पाण्याखाली जात आहेत. या इमारतीला संरक्षण म्हणून पालिकेने नाल्यात ५० लाख रुपये खर्चून भिंत बांधली. त्यामुळे वीस मीटरचा नाला अडीच मीटर एवढा झाला आहे. याबाबत खासदार राजेंद्र गावित आणि आयुक्त अनिलकुमार पवार यांनी स्पष्ट आदेश देऊन कारवाई करण्यास सांगितले आहे. इमारतीवर कोर्टातून स्थगिती असेल तर ती कायदेशीर मार्गाने हटवून इमारत जमीनदोस्त करा, असे खासदार गावित यांनी सांगितले आहे. या इमारतीला अभय देण्यात आले होते. पालिकेकडे वकिलांचे पॅनल आहे. नैसर्गिक नाल्यात इमारती बांधल्याचे न्यायालयाला सांगितले असते तर स्थगिती मिळाली नसती, असा आरोप शिवसेना वसई तालुकाप्रमुख नीलेश तेंडोलकर यांनी केला आहे.