वसई : वसई-विरार शहरात जागोजागी पडलेल्या कचऱ्याची समस्या दूर होण्याच्या मार्गावर आहे. तब्बल दोन वर्षांनी पालिकेने नवीन कचराकुंडय़ा खरेदीला मान्यता दिली असून तब्बल २० हजार कचराकुंडय़ा खरेदीच्या निविदा काढल्या आहेत. ओला आणि सुका कचरा वेगळा संकलित करण्यासाठी प्रत्येकी ३ हजार रुपये किमतीच्या या कचरा कुंडय़ा विकत घेतल्या जाणार आहेत. या कचराकुंडय़ा शहरातील निवासी संकुले, विविध आस्थापना, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.

शहरातील घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे व शहरातील स्वच्छता अबाधित राहावी यासाठी महापालिका परिसरात कचरा टाकण्यासाठी जागोजागी निळय़ा व हिरव्या रंगाच्या कचराकुंडय़ा ठेवण्यात आल्या होत्या. पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून सार्वजनिक ठिकाणे, सोसायटय़ा, नागरी वस्ती अशा विविध भागांत १५ हजारांहून कचराकुंडय़ा ठेवल्या होत्या. मात्र या कचराकुंडय़ा देखभालीअभावी अस्ताव्यस्त पडल्या आहेत. यातील काही कचराकुंडय़ा झिजल्या आणि खराब होऊन मोडकळीस आल्या होत्या,  त्या जागोजागी तुटल्या होत्या. कुंडय़ांमध्ये कचरा टाकला असता, तो रस्त्यावर पसरत होता. काही भागातील कचराकुंडय़ाच गायब झाल्या आहेत. कचरा टाकण्यासाठी कचराकुंडय़ा नसल्याने कचरा एका जागी जमा करून ठेवावा लागत आहे. फुटलेल्या कचराकुंडय़ांतून कचरा बाहेर पडून परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरू लागले आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यात खाद्यपदार्थ व शिळे अन्न शोधण्यासाठी श्वान या कचऱ्याच्या पिशव्या आजूबाजूच्या परिसरात पसरवतात. त्यामुळे आजूबाजूला खेळणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. याआधी पालिकेने मागील सहा वर्षांत जवळपास ३७ हजार ५०० इतक्या कचराकुंडय़ांची खरेदी केली होती. मात्र या कचराकुंडय़ांची योग्यरीत्या निगा राखली गेली नसल्याने त्यांची दुरवस्था झाली. पालिकेने कचरा कुंडय़ा द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. विशेष म्हणजे कचराकुंडय़ाच नसल्याने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण होत नव्हते.

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

वसई-विरार शहराचे झपाटय़ाने नागरीकरण वाढू लागले आहे. नव्याने इमारतीसुद्धा तयार होत आहेत. त्यामुळे कचरा कुंडय़ा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. करोनाच्या दोन वर्षांच्या काळात कचरा कुंडय़ा खरेदीची प्रक्रियादेखील पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे ही समस्या अधिकच बिकट झाली होती. त्यामुळे अखेर पालिकेने नव्या कचरा कुंडी खरेदीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

याबाबत माहिती देताना पालिकेच्या उपायुक्ता (घनकचरा) डॉ. चारूशिला पंडित यांनी सांगितले की, शहरातील कचराकुंडय़ा खरेदीचा निर्णय झाला असून २० हजार नव्या कचराकुंडय़ा खरेदी केल्या जाणार आहेत. त्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. निळय़ा आणि हिरव्या रंगाच्या कचराकुंडय़ाची जोडी विकत घेतली जाणार आहे. त्या दीर्घकाळ टिकाव्या यासाठी त्या चांगल्या दर्जाच्या असून प्रत्येक कचराकुंडीची किंमत ही ३ हजार रुपये आहे. शहरातली सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, चौक येथे त्या ठेवण्यात येणार आहे. याशिवास सर्व निवासी संकुलांना त्या विनामूल्य देण्यात येणार आहेत.

कचरा संकलन करताना काळजी घेण्याचे निर्देश

महापालिकेतर्फे सोसायटय़ांच्या आवारात असलेल्या कचराकुंडय़ामधील कचरा संकलित केला जातो. मात्र या कचराकुंडय़ा उचलून त्यातील कचरा गाडीत टाकताना योग्य रीत्या हाताळणी केली जात नसल्याने कचराकुंडय़ा फुटत असतात. त्यासाठी कचराकुंडय़ा योग्यरितीने हाताळाव्यात असे निर्देश सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली. कचराकुंडय़ांच्या खरेदीनंतर शहरातील रस्त्यांवरील कचऱ्याची समस्या दूर होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त अंजिक्य बगाडे यांनी व्यक्त केला आहे.