वसई : पाणी पट्टी कराची रक्कम थकीत ठेवणाऱ्या नळजोडणी धारकांच्या नळजोडण्या खंडित करण्यावर पालिकेने भर दिला आहे. आतापर्यंत पाणीपुरवठा विभागाने तीनशेहून अधिक नळजोडण्या खंडीत केल्या आहेत. वसई विरारमध्ये पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत पालिकेला पेल्हार, उसगाव, सुर्या टप्पा-१ व टप्पा-३ योजना, एमएमआरडीएची सुर्या योजना यातून ३५० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा केला जातो.

शहरात पालिकेकडून ६७ हजार इतक्या नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. यांच्या मार्फत पालिकेला पाणी पट्टी कर मिळतो. मात्र काही नळजोडणी धारक कर भरणा करीत नसल्याने पाणी पट्टी कर हा थकीत राहू लागला आहे. आधीच तोट्यात राहून महापालिकेला पाणी पुरवठा योजना चालवावी लागत आहे. त्यातच काही जण कर भरणा करण्याकडे दुर्लक्ष करतात त्याचा मोठा फटका महापालिकेला बसत आहे.

जे थकबाकीदार कर भरणा करण्याकडे दुर्लक्ष करीत होते. अशा धारकांच्या नळजोडण्या खंडित करण्यावर महापालिकेने भर दिला होता. ३१ मार्च अखेर पर्यंत तीनशेहून अधिक नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.थकबाकी दारांची थकीत पाणीपट्टी वसूल झाल्यानंतर फेर नळ जोडणी शुल्क भरून नंतर त्यांच्या जोडण्या पुन्हा कार्यान्वित केल्या जातील.

६९ कोटींची पाणीपट्टी कर वसुली

२०२५-२६ या आर्थिक वर्षात महापालिकेने मालमत्ता कर वसुलीचे ९९.७५ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार पाणीपट्टी कर वसूल करण्याचे काम सुरू केले होते. त्यापैकी ६९.४ कोटींची पाणीपट्टी कर वसूल झाला आहे. ज्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी पट्टी कर थकीत होता त्यांच्या नळजोडण्या ही खंडित करण्यात आल्या आहेत असेही पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

करवाढीचा निर्णय प्रलंबित

पाणी वितरण व्यवस्था करण्यासाठी वर्षाला साधारणपणे १९० कोटी रुपये इतका निधी खर्च करावा लागतो. या खर्च भरुन निघावा यासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात पाणी पट्टी करात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या कर वाढीवर अजूनही निर्णय झाला नाही.