वसई: आर्थिक वर्ष संपण्यास आता महिनाभराचा कालावधी उरला आहे. आतापर्यंत वसई विरार महापालिकेच्या कर संकलन विभागाने ३२६.७८ कोटींचा मालमत्ता कर वसूल केला आहे. निर्धारित केलेल्या उद्दिष्ट पैकी आतापर्यंत केवळ ३८ टक्के इतका कर वसूल झाला आहे.
वसई विरार महापालिका हद्दीत १० लाख १६ हजार एवढ्या मालमत्ता आहेत. त्यात छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती, उपहारगृहे, इमारती, सदनिका आदींचा समावेश आहे. या मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे.त्यामुळे हा मालमत्ता कर वसूल व्हावा यासाठी एप्रिल महिन्यापासून कर संकलन विभागाने पावले उचलली होती.
मागील वर्षीच्या तुलनेत मालमत्ता कर वसुली अधिक व्हावी यासाठी यावर्षी ८६० कोटींचे उद्दिष्ट ही ठरविण्यात आले आहे.मात्र निवडणूका व विविध उपक्रमाच्या कामकाजात महापालिकेचे कर्मचारी व्यस्त असल्याने त्याचा परिणाम हा मालमत्ता कर वसूलीवर झाला होता.त्यानंतर जानेवारी महिन्यापासून पुन्हा एकदा कर संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीवर भर दिला आहे.आतापर्यंत महापालिकेने नऊ प्रभागातून ३२६.७८ कोटी रुपयांची मालमत्ता कराची वसुली केली आहे.मागील वर्षी जवळपास ३९२ कोटी रुपये इतका कर वसूल झाला होता.
त्याही पेक्षा अधिक कर वसुली कशी होईल यावर भर दिला जात आहे. जे मालमत्ता कर थकीत ठेवतील त्यांच्या मालमत्ता जप्ती व नळजोडणी खंडित करणे अशा कारवाया सुद्धा सुरू केल्या जाणार असल्याचे मालमत्ता कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी सांगितले आहे.
अनेक वर्षे मालमत्ता कर थकवणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीसा बजावणे, त्यांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी नोटीसा बजावणे अशी कठोर पावले उचलली जातात चालू वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी अद्याप एक महिन्याचा अवधी असून अनेक मालमत्ताधारक शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच ३१ मार्चपर्यंत करभरणा करतात. त्यामुळे कर वसुलीत वाढ होईल असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.
प्रभाग समिती ए – ३४.८५ कोटी
प्रभाग समिती बी – ३७.३४ कोटी
प्रभाग समिती सी – २२.१ कोटी
प्रभाग समिती डी – १९.१८ कोटी
प्रभाग समिती ई – २५.१८ कोटी
प्रभाग समिती एफ – ५२.११ कोटी
प्रभाग समिती जी – १०५.७ कोटी
प्रभाग समिती एच – १८.२ कोटी
प्रभाग समिती आय – १२.३९ कोटी

