वसई : वसई विरार महापालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नालासोपारा पूर्वेत करण्यात आलेल्या कारवाईत ९ हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून पाच हजार दंड वसुलण्यात आला आहे.
प्लास्टिक वापरावर बंदी असून शहरातील विविध ठिकाणच्या भागात प्लास्टिकचा सर्रास पणे वापर सुरूच आहे. प्लास्टकचा वापर करू नका असे आवाहन करून अनेक दुकानदार, फळविक्रेते,व इतर साहित्य विक्रेते प्लास्टिक पिशव्या वापर करीत आहेत. दैनंदिन निघणाऱ्या कचऱ्यात ही प्लास्टिक चे प्रमाण अधिक आढळून येत आहे. यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने एकल वापर प्लास्टिक विरोधातील मोहीम तीव्र केली आहे.
नुकतीच आचोळे हद्दीतील साडी कंपाऊंड, नालासोपारा पूर्व येथील एका गोदामामध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा असल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक आयुक्त जितेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी जाऊन गोदामावर धाड टाकली व ९ हजार पेक्षा जास्त प्लास्टिक जप्त केले आहे. तर, या कारवाईत ५ हजार इतका दंड आकारण्यात आला आहे.
तसेच महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी कोणत्याही व्यापाऱ्याने प्रतिबंधित प्लास्टिक खरेदी किंवा विक्री करू नये, तसेच नागरिकांनीही याचा वापर करून शहर विद्रूप करू नये आणि पर्यावरणाची हानी पोहोचेल अशी कोणतीही गोष्ट करू नये, असे आवाहनही महापालिका आयुक्तांकडून करण्यात आले आहे.
असा आहे कारवाईचे स्वरूप
प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री, वापर करताना आढळल्यास नियमानुसार प्रथम वेळी ५००० रुपये दंड, द्वितीय वेळी १०,००० रुपये दंड आणि तृतीय वेळच्या गुन्हास २५,००० रुपये दंड व ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा असे कारवाई व दंडाचे स्वरूप आहे.
