वसई: वसई विरार महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवी यात येणाऱ्या योजनांसाठी अर्जासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे शहरातील गरीब, गरजू महिला आणि बालकांना मोठा दिलासा मिळाला असून, जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वसई विरार महापालिकेकडून समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक असते. तर ३१ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. पण, अनेक अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता आला नसल्याने आता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सदर योजनांचा महापालिका हद्दीतील पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.
कोणत्या योजनांसाठी करता येणार अर्ज?
विद्यावर्धिनी शैक्षणिक योजना: विधवा, निराधार, घटस्फोटित किंवा परित्यक्ता महिलांच्या पाल्यांना, तसेच एच.आय.व्ही. बाधित पालकांच्या मुलांना आणि अनाथ बालकांना शैक्षणिक अर्थसहाय्य मिळावे म्हणून राबविली जाणारी योजना.कोविड-१९ मदत योजना: कोरोना काळात आई किंवा वडील गमावलेल्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी राबविली जाणारी योजना.
आधारमाया योजना: कुष्ठरोग बाधित व्यक्ती आणि ६० वर्षांवरील एकाकी ज्येष्ठ महिलांच्या उपजीविकेसाठी मासिक अनुदान देण्यासाठी राबविण्यात येणारी योजना. जीवनदायिनी योजना: महिलांना डायलेसिस उपचार, कर्करोग उपचार, मॅमोग्राफी आणि पॅप स्मीअर चाचणीसाठी पालिकेमार्फत आर्थिक मदत देण्यासाठी असलेली योजना.
वरदायिनी आणि दत्तक योजना: निराधार मुलींच्या लग्नासाठी अनुदान, तसेच मुले दत्तक घेणाऱ्या पालकांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबविली जाणारी योजना.
असा करता येईल अर्ज
अर्जदारांना आता https://mahilabalkalyan.rtsvvmc.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरता येईल. तसेच ज्यांना ऑनलाइन अर्ज करणे शक्य नाही, त्यांना नजीकच्या प्रभाग कार्यालयात कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.

